दागिने गहाण ठेवून प्राजक्ताने घेतलं कर्जतचं फार्महाऊस, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "आईने FD मोडल्या अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:56 AM2024-01-03T11:56:35+5:302024-01-03T11:57:06+5:30
कर्जतचं फार्महाऊस घेण्यासाठी प्राजक्ताला दागिने गहाण ठेवावे लागले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने याचा खुलासा केला आहे.
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून प्राजक्ताने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच कर्जतमध्ये तिच्या स्वप्नातलं घर खरेदी केलं. कर्जतमधील या फार्महाऊसचे फोटो प्राजक्ताने शेअर केले होते. पण, हे फार्महाऊस घेण्यासाठी प्राजक्ताला दागिने गहाण ठेवावे लागले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने याचा खुलासा केला आहे.
प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या स्वप्नातल्या घराबद्दल भाष्य केलं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, "फार्म हाऊस घेणं हे मी केलेलं धाडस आहे. माझं तेवढं बजेट नव्हतं. त्यापेक्षा माझं निम्म बजेट होतं. पण मी त्या घराच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे आहे ती सगळी पुंजी मी पणाला लावली होती. पण, मला हे माहीत होतं की हे आयुष्यभरासाठी आहे. मला निसर्गाची प्रचंड आवड आहे आणि यातून मी काहीतरी इनकम सुरू करेन, हे मला माहीत होतं."
"कर्जतसारखं घर मला मुंबईत हवं होतं. पण, सध्या ते शक्य नाही. आवडत्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवणं हा कर्जतचं घर घेण्यामागील विचार होता. म्हणून मी धाडस केलं. या सगळ्यात कुटुंबीयांनी मला साथ दिली. त्या सगळ्यांनीही त्यांचं सोनं गहाण ठेवलं. भावाची चैन आणि आईचे दागिने गहाण ठेवले. आईने तर माझ्यासाठी तिच्या सगळ्या FD देखील मोडल्या," असंही प्राजक्ताने सांगितलं.
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी'नंतर प्राजक्ता अनेक मालिकांमध्ये दिसली. 'पावनखिंड', 'चंद्रमुखी', आणि 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'पांडू' अशा सिनेमांत काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. वेब सीरिजमध्येही प्राजक्ताने काम केलं आहे.