"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:38 PM2024-11-26T13:38:08+5:302024-11-26T13:38:28+5:30
मालिकेला ११ वर्ष झाली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) १३ वर्षांपासून मराठी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. तिने काही मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. मात्र तिला खरी लोकप्रियता 'जुळून येती रेशीमगाठी' (Julun Yeti Reshimgathi) मालिकेमुळे मिळाली. मालिकेला ११ वर्ष झाली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. यानिमित्त प्राजक्ताने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
'जुळून येती रेशीमगाठी' मालिका अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबावर होती. एकत्र कुटुंब, रुसवेफुगवे, मजामस्ती असं सर्वच या मालिकेत होतं. प्राजक्ता आणि ललितची जोडी तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. आजही त्यांना आदित्य-मेघना नावानेच हाक मारली जाते. दोन वर्ष मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २५ नोव्हेंबर २०१३ ते २६ सप्टेंबर २०१५ पर्यंत ५८२ एपिसोड्स पूर्ण करत ही मालिका संपली. प्राजक्ताने मालिकेसाठी केलेली विशेष पोस्ट
काय आहे प्राजक्ताची पोस्ट
फिरूनी नवी जन्मेन मी, सुवासिनी , नकटीच्या लग्नाला यायचं हं! या मालिका केल्या.तसंच सुगरण, गाणे तुमचे आमचे , गुडमॉर्निंग महाराष्ट्र कार्यक्रमाचं निवेदन केलं. मस्त महाराष्ट्र आणि झी मराठी (travel anchor), महाराष्ट्राची हास्यजत्राचं निवेदन असं सगळं केलं.
गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय. ह्या वर्षांमध्ये टिव्ही जगतात वरील projects केले, पण 'जुळून येती रेशीमगाठी' वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे. हा स्पेशल प्रोजेक्ट आहे. काल ह्या मालिकेला सुरू होऊन ११ वर्ष झाली. वेळ कसा निघून जातो. ११ वर्षात इतर अनेक चित्रपट- मालिका येऊनही रेशीमगाठी कधी झाकोळली गेली नाही. आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतूक करतात. प्रेमाचा वर्षाव चालूच आहे. हेच ह्या मालिकेचं खरं यश. हीच प्रेक्षकांची नि आमची रेशीमगाठ.
ही मालिका माझ्या पदरात पडली ह्याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच...कृतज्ञ."
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसंच मालिकेचा दुसरा सीझनही आणा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. मालिकेत ललित, प्राजक्ता यांच्यासोबतच उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या मोने, लोकेश गुप्ते, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, विग्नेश जोशी यांच्याही भूमिका होत्या.