अशांना किमान 15 गुण अधिक द्या...; नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर प्रशांत दामले यांची एकच इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:18 PM2021-08-08T17:18:57+5:302021-08-08T17:22:02+5:30
मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय याच निमित्ताने एक इच्छाही बोलून दाखवली.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याने सुवर्ण पदक जिंकलें आणि भारतीयांचा आनंद गगणात मावेनासा झाला. पहिल्या तीन फे-यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथी आणि पाचवी फेक फाउल गेली. मात्र पहिल्या तीन फेकीत त्याची कामगिरी उत्तम ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केले. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियावर लोकांनी या सुवर्ण कामगिरीसाठी नीरजला मनापासून शुभेच्छा दिल्यात. मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनीही नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय याच निमित्ताने त्यांनी एक इच्छाही बोलून दाखवली. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतून खेळाडू घडावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
नीरजचे अभिनंदन करताना प्रशांत दामले यांनी त्याचे कवी मित्र अमेय वैशपायन यांची एक कविता शेअर केली.
‘वाजली वाजली धून आपली पहा
झेपावत दूर दूर गेला भाला पहा
अस्त्र जणू सुटले ते लक्ष त्याने गाठले
सोनेरी पदकासी त्याने कवटाळले
अभिमानास्पद कृती ही ऊर भरून राहिले
आमचेही जन गण मन आज जगी गाजले,’ ही खास कविता त्यांनी पोस्ट केली.
शिवाय या पोस्टच्या खाली एका कमेंटमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतून खेळाडू घडावा, अशी इच्छा व्यक्त केली.
‘महाराष्ट्रातील आंतर शालेय स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं आणि त्यांच्या शाळेच्या अंतिम परीक्षेत त्यांना त्यासाठी किमान 15 गुण द्यायला हवेत तर त्यांचे पालक पण आनंदी आणि आश्वस्त राहतील,’ असे ते म्हणाले.
प्रशांत दामले यांचा हा विचार नेटक-यांनीही लगेच उचलून धरला. शालेय पातळीवर खेळाडू घडवणे, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकरी मंडळींनी दिली.