अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड; 10 पैकी 8 जागांवर झाला दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 04:42 PM2023-05-16T16:42:43+5:302023-05-16T16:43:37+5:30
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या विरोधात प्रसाद कांबळी उभे होते.
राजकीय निवडणुकीच्या रिंगणात जशी चढाओढ लागते, तशीच चढाओढ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणूक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पार पडली होती. या निवडणुकीचा आज (१६ मे) निकाल जाहीर झाला. त्यानुसार, रंगकर्मी पॅनल विजयी झालं असून ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. अशी माहिती नाट्यपरिषदेच्या वतीने देण्यात आली.
यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या विरोधात प्रसाद कांबळी उभे होते. या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी 8 जागांवर प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांचे उमेदवार निवडून आल्याचं पाहायला मिळालं.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात हे मतदान पार पडलं. यावेळी एकूण 1245 जणांनी मतदान केलं. तर, उर्वरित 83 जणांनीनगिरगाव येथील शाखेत आपली मत नोंदवली. तसंच मुंबई उपनगर (मुलुंड - बोरिवली- वसई) शाखेत 730 जणांनी मतदान केलं.
प्रशांत दामले यांना 759, सयाजी शिंदे यांना 634, सुशांत शेलार 623, विजय केंकरे 705, विजय गोखले 664, सविता मालपेकर 591, वैजयंती आपटे 590 आणि अजित भुरे यांना 621 अशी मत मिळाली आहेत. तर प्रसाद कांबळी यांना 565 आणि सुकन्या मोने यांना 567 इतकी मतं मिळाली आहेत.