'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- "त्यांचं आयुष्य..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:35 PM2024-09-13T15:35:03+5:302024-09-13T15:35:57+5:30
आनंद दिघेंनंतर प्रवीण तरडेंनी आणखी शरद पवार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'धर्मवीर २' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आनंद दिघेंची जीवनगाथा उलगडणाऱ्या धर्मवीरच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धर्मवीर २' सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेता प्रवीण तरडे यांनी केलं आहे. 'धर्मवीर' सिनेमातून प्रवीण तरडेंनी आनंद दिघेंचा जीवनप्रवास दाखवला. तर 'धर्मवीर २' मधून त्यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. आनंद दिघेंनंतर प्रवीण तरडेंनी आणखी एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'धर्मवीर २' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रसाद ओक, प्रवीण तरडे, क्षितीश दाते आणि मंगेश देसाई यांनी नुकतीच सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रवीण तरडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भरभरुन बोलले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. "धर्मवीरच्या वेळी एकनाथ शिंदे सेटवर आले होते. पण, यावेळी त्यांना मुख्यमंत्री असल्यामुळे ते शक्य झालं नाही. पण, ते जेव्हा येतात. तेव्हा प्रसन्न असतात. राजकारणात परिभाषा बदलत जातात. पण, एकनाथ शिंदे सतत काहीतरी काम करत असतात. दिघे साहेब जसं सकाळी १, २वाजता पुजेला जायचे. तसे आज मुख्यमंत्री असतानाही शिंदे साहेब जातात".
"प्रत्येक राजकारण्याची एक खासियत आहे. आजही शरद पवार साहेब गाडीतून चालले असताना बांध्यावरच्या साध्या माणसालाही हाक मारतात. शिंदे साहेबांचा वेगळा ऑरा आहे. राज ठाकरे कसंही बोलले तरी त्यांच्यावर माणसं प्रेम करतात. कारण, ते एक कलाकार आहेत. उद्धवसाहेब एक सुंदर फोटोग्राफर आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याचा हा गुण राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण स्वीकारला पाहिजे. आपण, कित्येकदा राजकारणी माणसाला राजकीय चष्म्यातून किंवा पक्षाच्या चष्म्यातून बघतो. त्यांच्या गुणांकडे दुर्लक्ष होतं. एकनाथ शिंदेंना कोणी काम करताना पाहिलं, तर दुश्मनही त्यांच्या प्रेमात पडेल. अशी माणसं खूप कमी असतात", असंही ते म्हणाले.
'धर्मवीर' नंतर कोणत्या राजकीय नेत्यावर चित्रपट करावासा वाटतोय? असा प्रश्न तरडेंना विचारला गेला. ते म्हणाले, "मला शरद पवार साहेबांवर चित्रपट करायला आवडेल. मी एक शेतकरी आहे. पवार साहेबांना आम्ही बांधावरचा नेता म्हणतो. ते सतत शेतावर, बांधावर असतात. आणि त्याचं आयुष्यही सिनेमॅटिक आहे. ते सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. बारामतीहून ते दौंडला रेल्वेतून भाज्या विकायचे. त्यांचा हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. आता ते माझ्या वाटेला येईल की नाही माहित आहे. दुसरं म्हणजे पतंगराव कदम यांच्यावर सिनेमा बनवायला आवडेल".