प्रेमकहाणीचा करमणूक प्रधान तडका...!

By Admin | Published: August 16, 2016 05:06 AM2016-08-16T05:06:59+5:302016-08-16T05:06:59+5:30

या नाटकाच्या शीर्षकावरूनच त्याचा संबंध अलीकडेच गाजलेल्या एका मराठी चित्रपटाशी जोडलेला असणार, हे तर उघडच दिसते. मग प्रश्न उरतो, तो म्हणजे नाटकाला हे शीर्षक देण्यामागचे

Prem khaina entertainment head tadka ...! | प्रेमकहाणीचा करमणूक प्रधान तडका...!

प्रेमकहाणीचा करमणूक प्रधान तडका...!

googlenewsNext

- राज चिंचणकर

नाटक : आरची परशा झिंगाट

या नाटकाच्या शीर्षकावरूनच त्याचा संबंध अलीकडेच गाजलेल्या एका मराठी चित्रपटाशी जोडलेला असणार, हे तर उघडच दिसते. मग प्रश्न उरतो, तो म्हणजे नाटकाला हे शीर्षक देण्यामागचे कारण काय? तर त्याचे उत्तर या नाटकात शोधावे लागते. या नाटकाच्या कथानकात असलेल्या प्रेमकहाणीच्या पात्रांची नावे, आरची उर्फ आर्ची आणि परशा उर्फ प्रशांत अशीच आहेत. हा संबंध जोडत आणि त्या चित्रपटातल्या गाण्यांचा ठेका वापरत, या नाटकाची कहाणी गुंफली आहे.
जनार्दन लवंगारे यांच्यासारखा अनुभवी नट जेव्हा रंगभूमीवर काही करू पाहतो, तेव्हा त्यात हमखास पिकणारे हशे आणि टाळ्यांची वाक्ये यांचा समावेश असणारच हे पक्के ठरून गेले आहे. अर्थात, हे नाटकही त्याला अपवाद नाही. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी आघाडी सांभाळत त्यांनी प्रेमकहाणीचा करमणूकप्रधान असा तडका या नाटकातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्याम, त्याची पत्नी राधिका, त्याचा नाटकवेडा भाऊ प्रशांत आणि त्यांचा ड्रायव्हर संपत अशी पात्रे या नाटकाच्या प्रारंभी एन्ट्री घेतात. नंतर त्यात नीता या तरुणीची भर पडते. नीता ही प्रशांतची प्रेयसी आहे, परंतु काही कारणास्तव ती त्याचे प्रेम अव्हेरून निघाली आहे. या धक्क्याने प्रशांतला वेडाचा झटका येतो. सर्वगुणसंपन्न असा संपत या प्रकरणात उडी घेत, या घरात नीतासारख्या दिसणाऱ्या आर्ची या बारबालेची परशासाठी एन्ट्री घडवून आणतो. पुढे जो काही हलकल्लोळ होतो, तो या नाटकातच पाहणे इष्ट ठरेल.
मनोरंजनाचा तडका द्यायचा या उद्देशाने जनार्दन लवंगारे यांनी त्यांची लेखणी चालवली आहे. खटकेबाज संवादांचा सढळ हस्ते उपयोग या नाटकात केला आहे. काही वेळा हे मुक्तनाट्य असल्याचेही जाणवत राहते. कारण यात अ‍ॅडिशन्स घ्यायला बराच वाव आहे. या कथेत तसे नावीन्य नसले, तरी नाटकाच्या सादरीकरणात राखलेली गती या नाट्याला तारून नेणारी ठरली आहे. मात्र, परशाच्या तोंडी असलेली स्वगते जरा जास्त झाली आहेत, ती आटोक्यात ठेवणे गरजेचे होते, हे नाटक पूर्णपणे दिवाणखान्यात घडत असताना, सगळी पात्रे कायम चप्पल आणि बूट घालून का वावरतात, याचे उत्तर मिळत नाही. राधिकाचे पात्र कायम वरच्या पट्टीत बोलते, हेही खटकते. नाटकात प्रसंगानुरूप सोडलेल्या हंशा मिळवण्याच्या जागा मात्र चांगल्या भरल्या आहेत. सद्यस्थितीतल्या घटनांवर केलेल्या प्रासंगिक कोट्या पसंतीस उतरणाऱ्या आहेत.
ड्रायव्हरच्या भूमिकेत स्वत: जनार्दन लवंगारे आहेत आणि त्यांच्या खास लकबी यथेच्छ वापरत त्यांनी यात धमाल उडवून दिली आहे. त्यांचे अचूक टायमिंग ही दाद देण्याजोगी बाब आहे. नीता आणि आर्ची अशी दोन पात्रे निर्मला चव्हाण हिने रंगवली आहेत. नाटकाचा फोकस तिच्यावरच अधिक असल्याने तिची जबाबदारी मोठी होती आणि ती तिने योग्य रीतीने पेलली आहे.
नीतापेक्षा आर्चीचे पात्र रंगमंचावर अधिक काळ आहे आणि तिने ते टेचात व बिनधास्त रंगवले आहे. शशिकांत भोबेकर यांनी यातला श्याम मस्त उभा केला आहे, तर नयन पवार
(राधिका) यांनी आवश्यक ते रंग भरत ही भूमिका साकारली. स्वप्नील कद्रेकर (प्रशांत) याने खडा आवाज लावत उभ्या केलेल्या विविध व्यक्तिरेखा लक्षात राहतात. बाकी तांत्रिक
बाबीत फार काही वेगळे प्रयोग केलेले नाहीत. मोठी स्टारकास्ट नसतानाही या नाटकाने मनोरंजनाचा पाजलेला डोस मात्र सहजपणे घशाखाली
उतरणारा आहे.

Web Title: Prem khaina entertainment head tadka ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.