Lata Dinanath Mangeshkar Award: 'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 06:06 PM2022-04-24T18:06:46+5:302022-04-24T18:52:57+5:30
Lata mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षापासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत.
मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं (Lata Dinanath Mangeshkar Award) वितरण सोहळा आज संपन्न होत आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असून दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने प्रथमच हा पुरस्कार दिला जात आहे. विशेष म्हणजे पहिलावहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षापासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवण्यात आलं. "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार दरवर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र अशा स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, गेल्या ३२ वर्षांपासून मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. यंदाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. लता मंगेशकरांच्या नावे दिला जाणारा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"मी सामान्यतः कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण, लतादीदींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्याचा मोह मला आवरता आला नाही. हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रेमाचे प्रतिक आहे. लतादीदी वयानेही मोठ्या होत्या व कर्मानेही. त्यामुळे हा पुरस्कारही सर्वांचा आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
मोदींसह हे मान्यवर होते उपस्थित
या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं.