प्रिया बापट म्हणतेय, 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:15 PM2021-08-09T17:15:10+5:302021-08-09T17:15:39+5:30

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट 'आणि काय हवं ?' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Priya Bapat says, 'Husband's support is important in those days | प्रिया बापट म्हणतेय, 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची

प्रिया बापट म्हणतेय, 'त्या' दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची

googlenewsNext

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची लोकप्रिय वेबसीरिज 'आणि काय हवं'चा तिसरा सीझन रिलीज झाला आहे. त्याच्या पहिल्या दोन सीझनप्रमाणेच तिसरा सीझनही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. विशेष म्हणजे या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच नवरा-बायकोचे नाते छोट्या-छोट्या गोष्टींतून अधिक कसे बहरेल, या संबंधित अनेक विषयांना हळुवार स्पर्श करण्यात आला आहे. 

एकत्र खरेदी करण्यापासून ते एखादा छंद एकत्र जोपासण्यापर्यंतचे अनेक छोटे छोटे आनंदाचे क्षण यात दाखवण्यात आले आहेत. अगदी मासिक पाळीसारखा नाजूक विषयही खूप सहजरित्या हाताळण्यात आला आहे. आपल्याकडे 'पिरेड्स' हा शब्द चारचौघात बोलतानाही अनेकदा ओशाळल्यासारखे होते. मात्र हा विषयही इथे कोणताही संकोच न बाळगता अतिशय सुंदर, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडला आहे. 


जुई आणि साकेत एका समारंभाला जाण्यासाठी निघतात आणि  जुईला पिरेड्स येतात. त्यानंतर जुईचे मूड स्विंग्स, साकेतला तिच्याबद्दल वाटणारी काळजी, लहानपणीच्या मासिक पाळी संबंधीच्या दोघांच्या आठवणी, सॅनिटरी पॅड हे अगदी छान आणि हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नाजूक विषयाला कुठेही धक्का लागणार नाही आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत लेखक, दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी हा विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे. 


'आणि काय हवं' मध्ये  'पिरीएड्स' सारखा विषय हाताळण्याबद्दल प्रिया आणि उमेश म्हणतात, ''जेव्हा आम्हाला कळले की, मासिक पाळीसारखा विषय आपण प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत, तेव्हा जरा आम्ही साशंक होतो की, प्रेक्षक हा विषय कसा स्वीकारतील. मात्र जेव्हा आम्ही स्क्रिप्ट पाहिली आणि त्याचे  शूट पूर्ण केले तेव्हा ती शंका नाहीशी झाली. इतक्या सहजरित्या तो आम्ही चित्रित केला. वरुणने हा विषय अगदी छान पद्धतीने हाताळला आहे. या दिवसांत नवऱ्याची साथ किती महत्वाची असते, हे खूपच छान मांडले आहे. कोणताही विषय अगदी सहजपणे मांडणे, ही वरुणची खासियत आहे.''


एमएक्स प्लेअर आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सिझनचे सहा भाग असून ते प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर पहायला मिळेल.

Web Title: Priya Bapat says, 'Husband's support is important in those days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.