"प्रसिद्ध दिग्दर्शकाने अभिनयला सर्वांसमोर शिव्या दिल्या आणि...", प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:14 PM2023-12-01T14:14:39+5:302023-12-01T14:15:19+5:30
स्टारकिड असूनही अभिनयला सिनेसृष्टीत वाईट वागणूक मिळाली. प्रिया बेर्डेंनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा करत एक प्रसंग सांगितला.
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी कलाविश्वातील मोठं नाव आहे. उत्कृष्ट अभिनय आणि विनोदाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी स्वत:चं नाव कमावलं. केवळ मराठीच नाही तर प्रेक्षकांच्या लाडक्या लक्षाने बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ९०चं दशक गाजवणाऱ्या दिवगंत लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डेदेखील अभिनेत्री आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय बेर्डेनेदेखील कलाविश्वाची वाट धरली. पण, स्टारकिड असूनही त्याला सिनेसृष्टीत वाईट वागणूक मिळाली. प्रिया बेर्डेंनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
'लोकमत फिल्मी'च्या 'नो फ्लिटर'मध्ये प्रिया बेर्डेंनी हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी अभिनयबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. एका पार्टीत प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून अभिनयला अपमानास्पद वागणूक मिळाली होती. हा प्रसंग शेअर करताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, "कार्यक्रम झाल्यानंतर तू माझ्या पाया पडला नाहीस, असं एका मोठ्या दिग्दर्शकाकडून अभिनयला म्हटलं गेलं होतं. यावरुन त्यांनी भर पार्टीत अभिनयला सगळ्यांसमोर शिव्याही दिल्या होत्या. या सगळ्या प्रकारानंतर अभिनय व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन रडत होता. तेव्हा मला खूप राग आला होता. पण, मी तेव्हा काहीच बोलले नाही. कारण, त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे."
"पुढची पाच वर्ष मी तुला माझ्या चित्रपटात घेणार नाही, असंही ते दिग्दर्शक अभिनयला म्हणाले होते. तेव्हा मी अभिनयला म्हणाले होते की खरंच मी आयुष्यात काही चांगलं काम केलं असेल तर पुढची पाच वर्ष ते दिग्दर्शक या इंडस्ट्रीमध्ये असतील का ते आपण बघूया. आणि तसंच झालं...मला या गोष्टीची खूप चीड आली होती. एका मुलाशी असं कोण कसं काय वागू शकतं? असे वाईट अनुभव आले आहेत. लोकांना बाहेरून जसं दिसतं तसं नाहीये...आम्हालाही अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण, या सगळ्यामुळे अभिनय हुशार झाला," असंही प्रिया बेर्डे म्हणाल्या.
अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'मन कस्तुरी रे', 'बॉईज ४', 'रंपाट', 'अशी ही आशिकी', 'बांबू' अशा अनेक चित्रपटांत तो महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला.