'त्याचा बाप जिवंत नाहीये ना', इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांनी दिली अभिनयला वाईट वागणूक; प्रिया बेर्डेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:40 PM2023-08-20T15:40:09+5:302023-08-20T15:40:46+5:30
Priya berde: अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर कलाविश्वात अभिनयला कशाप्रकारे वागवलं गेलं हे सांगितलं.
आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे मराठी कलाविश्वाचा स्तर उंचावर नेणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). मराठीसह बॉलिवूडमध्येही राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने त्याची प्रत्येक भूमिका गाजवली. त्यामुळे आजही त्यांचे सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. परंतु, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना कोणकोणत्या समस्या आल्या, कलाविश्वातील लोक त्यांच्याशी कसे वागले हे अलिकडेच प्रिया बेर्डे (priya berde) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत यांनी कलाविश्वात मोठं नाव कमावलं. मात्र,तरीदेखील त्यांच्या मुलांना या क्षेत्रात अनेक अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं. अनेकांनी अभिनयला टोमणेदेखील मारले, असे अनेक खुलासे केले.
"ज्यावेळी माझी मुलं या क्षेत्रात आली त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेची मुलं आहात म्हणून तुम्हाला २-३ सिनेमा मिळतील. पण, पुढे काय? त्यामुळे तुम्हालाच मेहनत करुन इथे नाव कमवायचं आहे. त्यामुळे इथे आल्यावर त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. पण, इंडस्ट्रीतील अनेक लोक आजही त्यांना टोमणे मारतात. 'तुम्ही काय लक्ष्मीकांत बेर्डेची मुलं' असं म्हणून लोक सर्रास त्यांना टोमणे मारतात. आम्हाला इतके वाईट अनुभव आलेत ना.अनेक मोठ्या लोकांकडून असेही अनुभव आलेत जे मी सांगू शकत नाही. इतकी मोठी नावं आणि त्यांनी खूप वाईट पद्धतीने वागणूक दिलीये", असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे ती म्हणते," खासकरुन अभिनयला असे खूप अनुभव आले. ज्या लक्ष्मीकांत बेर्डेला लोकांनी एवढं प्रेम दिलं. त्याच्या मुलाला प्रेक्षक ही अशी वागणूक देतात. हो खरंच देतात. का नाही? कारण, त्याचा बाप नाहीये ना जिवंत. ते असते तर गोष्ट वेगळी असती. म्हणून म्हटलं हे स्ट्रगल फार वेगळं आहे. लोकांच्या मनात प्रेम असतं पण इथे असं काही नसतं. इथे माझ्या मुलांना खूप सहन करावं लागलं आहे. खूप मान- अपमान सहन करावे लागले आहेत. महिना-महिनाभर आमचं घर डिस्टर्ब राहिलं आहे."