प्रिया-उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोग झाला हाऊसफूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 04:08 PM2023-08-06T16:08:09+5:302023-08-06T16:08:54+5:30
Jara Tar Chi Gosh: जवळपास १० वर्षानंतर ही जोडी रंगमंचावर पुन्हा एकत्र आली आहे.
मराठी कलाविश्वातील परफेक्ट कपल म्हणजे प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (umesh kamat) . जवळपास १० वर्षानंतर ही जोडी रंगमंचावर पुन्हा एकत्र आली आहे. या जोडीची रिअल लाइफ केमिस्ट्री जितकी लोकांना आवडते तितकचं त्यांना पडद्यावर एकत्र पाहायलादेखील प्रेक्षकांना आवडतं. नुकताच या दोघांच्या जर तरची गोष्ट या नाटकाचा दणक्यात शुभारंभ झाला. विशेष म्हणजे या नाटकाचा पहिलाच प्रयोग हाऊसफूल झाला. त्यामुळे सध्या प्रिया- उमेश चांगलेच आनंदात आहेत.
‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे,’’ असं शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम यांनी म्हटलं.
अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित या नाटकाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं आहे. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.