Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 12:46 AM2018-12-02T00:46:13+5:302018-12-02T00:52:44+5:30
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले आहेत.
जोधपूर- प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये जोरदार आतषबाजी झाली आहे. या आतषबाजीमुळे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. राजस्थानमधल्या जोधपूर इथल्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये विवाह झाल्यानंतर जवळपास मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.
लग्नानंतर जवळपास तीन मिनिटांपर्यंत ही फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. या फटाकेबाजीचा सोशल मीडियावरून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरून प्रियंका आणि निकच्या लग्नादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीला युजर्सनी असंवेदनशील म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनं आता कुठे गेले सर्वोच्च न्यायालयाचे नियम, असा टोला लगावला आहे.
दिवाळीला सांगितलं की फटाके फोडू नका, आता त्यांना का कोणी रोखत नाही. तर एका युजर्सनं सेलिब्रिटींना फटाके फोडण्याची परवानगी का दिलीय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता सर्वोच्च न्यायालय कुठे आहे.
प्रियंकानं शेअर केले मेहंदीचे फोटो
प्रियंकानं स्वतःच्या मेहंदीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेहंदी सेरेमनीचेही प्रियंकानं फोटो शेअर केले आहेत. प्रियंकानं राजस्थानी पद्धतीचा विविध रंगांनी सजलेला लेहंगा परिधान केला होता. तसेच प्रियंकानं या पेहरावाला साजेसे असे दागिने आणि गजरा माळला होता. तर एका फोटोमध्ये प्रियंका या लेहंग्यात गोल फिरताना दिसतेय. निक जोनास यानंही भारतीय पद्धतीचे कपडे परिधान केले आहेत. निक आणि प्रियंकाचे आउटफिट अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तयार केले आहेत.
उद्या करणार हिंदू पद्धतीनं लग्न
ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केल्यानंतर उद्या प्रियंका आणि निक जोनास हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे लग्न करणार आहेत. हे लग्न उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला होणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणाऱ्या या लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.