‘जंगलबुक’च्या मध्यांतरावेळी ‘पीव्हीआर’मध्ये प्रोजेक्टर बंद
By Admin | Published: April 15, 2016 01:44 AM2016-04-15T01:44:39+5:302016-04-15T01:44:39+5:30
लोअर परळ येथील फिनिक्स पीव्हीआरमध्ये गुरुवारी सायंकाळी ५:१५ वाजता असलेल्या ‘जंगलबुक’ सिनेमाच्या मध्यांतराला अचानक प्रोजेक्टर बंद झाल्याने पुढचा शो रद्द करण्यात आल्याचा
लोअर परळ येथील फिनिक्स पीव्हीआरमध्ये गुरुवारी सायंकाळी ५:१५ वाजता असलेल्या ‘जंगलबुक’ सिनेमाच्या मध्यांतराला अचानक प्रोजेक्टर बंद झाल्याने पुढचा शो रद्द करण्यात आल्याचा प्रकार घडला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर सिनेमागृहाच्या व्यवस्थापकाने प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त शोचे पैसे परत केले. मात्र अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे प्रेक्षकांमधून खासकरुन बच्चे कंपनीतून निराशेचा सूर उमटला.
फिनिक्स सिनेमागृहात या सिनेमावेळी सुमारे ४० टक्के लहानग्यांनी हजेरी होती. या चित्रपटासाठी उत्साहात असणाऱ्या चिमुरड्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली. यावेळी, प्रोजेक्टर बंद झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांशी बोलून शो पुन्हा सुरु करण्याविषयी चर्चा केली. मात्र ‘काही वेळात सुरु होईल’ असे सांगून २०-२५ मिनिटानंतर व्यवस्थापकाने शो रद्द झाल्याचे प्रेक्षकांना सांगितले.
याविषयी नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रेक्षकाने ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही शोची दोन तिकिटे बुक केली होती. ‘जंगलबुक’शोच्या मध्यांतरावेळी पडदा हिरवा झाला आणि अचानक प्रोजेक्टर बंद झाल्याचे निदर्शनास आले. बराच वेळ शो पुन्हा सुरु होण्याची प्रतीक्षा केली, परंतु प्रोजेक्टर दुरुस्त होणार नसल्याचे सिनेमा व्यवस्थापकांनी सांगितल्याने सर्वांचीच निराशा झाली. या संदर्भात लोअर परळ फिनिक्स पीव्हीआरच्या मॅनेजरशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
२४ मार्चलाही
‘टेक्निकल एरर’
२४ मार्च, २०१६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता फिनिक्स सिनेमागृहात ‘कपूर अँड सन्स’च्या शो वेळी ‘टेक्निकल एरर’ असल्याचे सांगून सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनी शो रद्द झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एक तासाने प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आले. मात्र शो सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांना हे सांगण्यात आल्याने निराश झालेल्या त्यांना आल्यापावली परत जावे लागले होते.