SHOCKING! पुनीत राजकुमार सारखं नेत्रदान करता यावं म्हणून तीन चाहत्यांची आत्महत्या, आत्तापर्यंत 10 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:07 PM2021-11-07T13:07:18+5:302021-11-07T13:11:34+5:30
Puneeth Rajkumar Death: चाहत्यांना पुनीतच्या मृत्यूचा इतका जबर धक्का बसला की तिघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सात जणांनी आत्महत्या केली.
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याचं गेल्या 29 ऑक्टोबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एका आठवड्यानंतरही त्याच्या मृत्यूचा धक्का चाहते पचवू शकलेले नाहीत. पुनीतच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेल्या 10 चाहत्यांच्या मृत्यूची प्रकरणं कर्नाटकात समोर आली आहेत. यात काही आत्महत्येची प्रकरणंही आहेत. पुनीतच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. तीन चाहत्यांनी तर पुनीतसारखं मृत्यूपश्चात नेत्रदान करता यावं म्हणून आत्महत्या केली. पुनीत गेल्यानंतर अचानक कर्नाटकात नेत्रदानाचा आकडा वाढला आहे.
पुनीतच्या निधनानंतर चाहत्यांना इतका जबर धक्का बसला की 7 लोकांनी दु:ख अनावर झाल्यानं आत्महत्या केली. तर दोघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. याशिवाय तीन लोकांनी केवळ पुनीतसारखं नेत्रदान करता यावं म्हणून आत्महत्या केली. 3 नोव्हेंबरला टुमकूर येथे राहणा-या भरत नावाच्या व्यक्तिने आत्महत्या केली. ‘अप्पूच्या जाण्याचं दु:ख मला सहन होत नाहीये. मी त्याच्यासोबत जातोय. त्याच्यासारखे माझेही डोळे दान करा,’ असं त्याने त्याच्या सूसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. बेंगळुरू शहरातील राजेंन्द्र नावाच्या चाहत्यानेही केवळ नेत्रदानासाठी गळफास लावून आत्महत्या केली. रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना येथे राहणा-या 26 वर्षीय व्यंकटेशही पुनीतच्या जाण्याचा धक्का सहन करू शकला नाही. त्यानेही आत्महत्या केली.
नारायण नेत्रालयाचे डॉक्टर भुजंग शेट्टी यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पुनीतच्या मृत्यूनंतर अचानक नेत्रदानाचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं. पुनीतच्या निधनानंतर रोज 1000 नेत्रदानाचे अर्ज आम्हाला मिळत आहेत. आधी ही संख्या 50-100 होती.
पुनीतने त्याच्या वडिलांप्रमाणेच नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्याच्या मृत्यूंनंतर नेत्रदान करण्यात आलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने नेत्रदानासाठी शस्त्रक्रिया केली. त्याच्या या नेत्रदानामुळे चार दृष्टिहिनांच्या आयुष्यात नवा प्रकाश आला आहे.
फॅमिली डॉक्टरांना पोलीस संरक्षण
पुनीतच्या फॅमिली डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. पुनीतच्या अनेक चाहत्यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पुनीतच्या डॉक्टरांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिवनगर इथल्या डॉ. रमणराव यांच्या निवासस्थान आणि क्लिनिकच्या बाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.