हाऊसफुल्ल चाललेल्या 'Sooryavanshi'ला पंजाबात होतोय विरोध; अक्षय कुमारवर आंदोलक शेतकऱ्यांचा राग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 03:19 PM2021-11-06T15:19:56+5:302021-11-06T15:22:32+5:30
देशभरातील अनेक चित्रपटगृहांत ‘Sooryavanshi’चे हाऊसफुल शो सुरू आहेत. पंजाबात मात्र काही ठिकाणी या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसतोय.
सुमारे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमावर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या. देशभरातील अनेक चित्रपटगृहांत ‘सूर्यवंशी’चे हाऊसफुल शो सुरू आहेत. पंजाबात मात्र काही ठिकाणी या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसतोय. आंदोलनकर्त्या शेतक-यांनी या चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यास भाग पाडले.
प्राप्त माहितीनुसार, पंजाबच्या बुडलाधा येथील दोन चित्रपटगृहांत आज सकाळचे शो आंदोलनकर्त्यांच्या विरोधामुळे रद्द झालेत. रोपडमध्येही ‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन थांबवण्यात आलं.
‘पंजाब किसान एकता मोर्चा’ने आपल्या फेसबुक पेजवर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. ‘ते आले, त्यांनी आपल्याला लुटलं आणि मग आपल्या विसरून गेले... आम्ही पंजाबच्या चित्रपटगृहांमध्ये सूर्यवंशीच्या प्रदर्शनास तीव्र विरोध करतो. आम्ही आता आमची आणखी लूटमार होऊ देणार नाही,’असं या फेसबुक पेजवर लिहिलं आहे.
म्हणून होतोय चित्रपटाल विरोध
केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकºयांचे आंदोलन सुरू आहेत. पंजाबात या आंदोलनातील शेतकºयांनी अक्षयच्या चित्रपटाला विरोध चालवला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी केलेल्या दाव्यानुसार, अक्षय कुमार हा भाजपा आणि मोदी सरकारचा सपोर्टर आहे. त्यामुळे त्यांनी अक्षयच्या चित्रपटाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पटियालाच्या चित्रपटगृहांमध्येही सूर्यवंशीचं प्रदर्शन थांबवण्याच्या निर्णयावर विचार सुरू आहे.