गतकाळातल्या आठवणींची पुरचुंडी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2016 03:51 AM2016-11-06T03:51:55+5:302016-11-06T03:51:55+5:30

जग बदलले, माणसेही बदलली आणि या स्थित्यंतरातून पैशाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले. नव्हे, पैशाचा महापूरच आला आणि त्यात बरेच काही वाहून गेले. संस्कार, नाती, आपुलकी

Purbakundi memories of the past ..! | गतकाळातल्या आठवणींची पुरचुंडी..!

गतकाळातल्या आठवणींची पुरचुंडी..!

googlenewsNext

- राज चिंचणकर

नाटक - ‘पै पैशाची गोष्ट’

जग बदलले, माणसेही बदलली आणि या स्थित्यंतरातून पैशाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले. नव्हे, पैशाचा महापूरच आला आणि त्यात बरेच काही वाहून गेले. संस्कार, नाती, आपुलकी, विश्वास, माणुसकी, मन:स्वास्थ्य या सगळ्यावर या परिस्थितीचा परिणाम झाला. पैसा हेच आजच्या पिढीचे साध्य झाले आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसण्याची जिद्दही निर्माण झाली, पण या संक्रमणातून अनेक प्रश्नही उपस्थित झाले. मागच्या पिढीला तर हा ओघ स्वप्नवत वाटला आणि तो थोपवणार कसा, या विचारात ही पिढी मग्न झाली. मागचे संचित आणि आधुनिकता यात या पिढीचा गोंधळ उडाला. हेच सूत्र गाठीशी घेऊन गतकाळातल्या पुरचुंडीतून आठवणींच्या गाठी सोडवत ‘पै पैशाची गोष्ट’ हा प्रयोग ताल धरतो आणि त्यातून नव्या पिढीला काही सांगू पाहण्याचा प्रयत्नही करतो.
चरितार्थ चालवताना मागच्या पिढीकडे शिल्लक काही उरायचे नाही, ही त्यांची चिंता होती, तर आजच्या पिढीकडे वारेमाप पैसा आल्याने तो खर्च कसा करावा, याबाबत विचार होताना दिसतो. यातून चंगळवादाला खतपाणी मिळते ते वेगळेच! हाच सूर ‘पै पैशाची गोष्ट’ ही मूळ कथा लिहिताना लेखिका विजया राजाध्यक्ष यांच्या लेखणीने पकडला आहे. एका आजीच्या नजरेतून या गोष्टीतले मनोगत त्यांनी मांडले आहे. ही आजी तशी सुखवस्तू घरातली आहे आणि एकदा घरातला जुना पेटारा उघडल्यावर ती आठवणींत रममाण होते. त्या पेटाऱ्यातल्या चीजवस्तू तिच्या मनात पुन्हा एकदा घर करू लागतात आणि या वस्तू हाताळत, ती आयुष्याचे सार सांगून जाते.
हा प्रयोग संवादी आहे आणि संवाद माध्यमातूनच तेव्हाचे व आताचे जगणे यावर दृष्टिक्षेप टाकला गेला आहे. विजया राजाध्यक्ष यांच्या या मूळ कथेचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन विपुल महागांवकर याने केले आह, तर या प्रयोगातल्या आजीची भूमिका इला भाटे यांनी त्यांच्या एकटीच्या खांद्यावर पेलली आहे. साध्या राहणीमानापासून, सशक्त अशा सांपत्तिक स्थितीपर्यंतचा हा आलेख आहे. या आजीच्या पेटाऱ्यातून त्या काळच्या ढब्बू पैसा, अधेली अशा नाण्यांपासून जुन्या लग्नपत्रिका, फोटो, हिशेबांची वही अशा विविध वस्तू बाहेर येत जातात आणि तिचा भूतकाळ थेट वर्तमानाशी संवाद साधू लागतो. किती बदललेय जग, हा विचार तिच्या व्यक्तिमत्त्वातून वेळोवेळी प्रकट होत जातो. आजच्या जगरहाटीने ही आजी भांबावून गेली आहे. ती जगलेले आयुष्य आणि आताचे जीवनमान यांची तुलना करताना ती गोंधळून गेली आहे, पण तरीही स्वत:शी आणि पर्यायाने प्रेक्षकांशी संवाद साधताना तिचा मनोव्यापार ती उघड करत जाते.
हा प्रयोग म्हणजे दीर्घांक आहे आणि त्याची योग्य नस पकडून दिग्दर्शक विपुल महागांवकर याने तो मंचित केला आहे. केवळ एका पात्राच्या माध्यमातून हा विचार पोहोचवण्यासाठी आणि त्या पात्रावर फोकस ठेवताना, दिग्दर्शकाने प्रेक्षकांचे लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी मुदलातच घेतल्याचे जाणवते. मात्र, या प्रयोगातल्या आजींनी हा पेटारा उघडून बसल्यावर, त्यांच्या रंगमंचीय वावरावर बरीच मर्यादा आल्याचे स्पष्ट होते. प्रयोगातल्या उपलब्ध प्रॉपर्टीचा उपयोग करून घेत, हा दोष टाळता येणे सहज शक्य होते. परंतु तसे न झाल्याने लक्ष केवळ एकाच ठिकाणी केंद्रित होते. वास्तविक, यात वैविध्य आणण्यासाठी आणि त्या पात्रासाठी ‘व्यवहार’ म्हणून बऱ्याच जागा वापरता येणे शक्य होते. त्याचप्रमाणे, हा प्रयोग केवळ एकाच पात्रावर मंचित करण्यापेक्षा अजून एखादे पात्र या आणले असते, तर प्रयोगाची रंजकता अजून वाढली असती, असेही जाणवत राहते.
अशा प्रकारच्या प्रयोगात कलावंताची कसोटी लागते. मात्र, इला भाटे यांनी गाढ अनुभवाच्या जोरावर यात पैलतीर गाठला आहे. संपूर्ण दीर्घांकभर प्रेक्षकांना एका पात्राभोवती खिळवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. इला भाटे यांनी मात्र, त्यात बाजी मारली आहे. त्यांचे संथ लयीतले बोलणे, देहबोलीचा वापर, उत्तम संवादफेक, अचूक हातवारे, मुद्राभिनय आणि आवश्यक तिथे घेतलेले विराम, यामुळे हे पात्र मनात घर करते. अमर गायकवाड यांचे मोजके नेपथ्य, जयदीप आपटे यांची प्रकाशयोजना आणि प्रबोध शेट्ये यांचे संगीत या प्रयोगाला पूरक साथ देणारे आहे, तर विनया मंत्री यांची वेशभूषा आणि प्रदीप दर्णे यांची रंगभूषा यातल्या नाट्याला अनुसरून आहे. जुन्याचे नव्याशी असलेले लागेबांधे जुळवून आणणारा आणि नव्या पिढीला, मागच्या पिढीची खरीखुरी ओळख करून देणारा ‘तालीम’ निर्मित हा प्रयोग म्हणजे गतस्मृतींवर अलगद हळुवार घातलेली फुंकर आहे.

Web Title: Purbakundi memories of the past ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.