'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पुष्कर श्रोत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:22 PM2024-04-24T12:22:31+5:302024-04-24T12:23:04+5:30
जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने आपलं मत मांडलं आहे.
मराठी अभिनेता व लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिन्मय मांडलेकरला मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची रजा घेत असल्याचं जाहीर केलं. यावर आता अनेक कलाकार मंडळींनी त्याला पाठिंबा देत त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आता यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने आपलं मत मांडलं आहे.
चिन्मयचा मुलगा जहांगीर हा 11 वर्षांचा आहे. नावावरून ट्रोलिंग होत असताना चिन्मयच्या बाजूने मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आवाज उठवला. अभिनेता पुष्कर श्रोत्रीने चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला, 'मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकर त्याच्या मुलावर वेगळे संस्कार करतोय का? भारतीय संस्कृतीमधलेच संस्कार करतोय ना. आजची परिस्थिती कशी आहे, आजूबाजूचा सगळा विचार करूनच चिन्मय मुलाचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतोय. त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो?'
'तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल, तर तुम्हाला इतिहास माहितीये का? 'जहांगीर' हे नाव का ठेवलं, हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, खोटे फोटो लावून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं?' असं स्पष्ट मत पुष्कर श्रोत्रीन मांडलं आहे. मराठी बातमीवाला या YouTube चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मृण्मयी व गौतमी देशपांडे, अदिती सारंगधर, सुरुद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर या मराठी कलाकारांनी घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. मराठी कलाकारांसह चिन्मयच्या चाहत्यांनीही कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील पाचही चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे उर्वरित तीन चित्रपटांचं काय होणार, महाराजांच्या भूमिकेत कोण झळकणार? अशा असंख्य कमेंट्स चिन्मयच्या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही त्याला चाहत्यांकडून करण्यात येत आहे.