सर्व सोडून अमेरिकेत शिक्षणासाठी गेला! इरफानमुळे पुन्हा भारतात आला, आज बिग बजेट सिनेमांचा नायक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:30 PM2024-11-18T13:30:52+5:302024-11-18T13:35:58+5:30
अमेरिकेत शिक्षण घेत होता. इरफानचा सिनेमा बघितला अन् तो मनोरंजन विश्वात आला. आज भारतीय सिनेसृष्टीत त्याच्याच नावाचा दबदबा
इरफान आज आपल्यात नसला तरी त्याचे सिनेमे आजही आपलं तितकंच मनोरंजन करतात. 'पिकू', 'लंचबॉक्स', 'करीब करीब सिंगल', 'पान सिंग तोमार' अशा इरफानच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलंय. आज दर्दी सिनेरसिक इरफानची आठवण काढतात. तुम्हाला माहितीये का? इरफानचा अभिनय पाहून प्रेरणा घेऊन एका व्यक्तीने सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. आज हा अभिनेता भारतीय मनोरंजन विश्व चांगलंच गाजवतोय. आगामी 'पुष्पा २' मध्ये हा अभिनेता दिसणार आहे. त्याचं नाव फहाद फासिल.
इरफानचा सिनेमा फहादने पाहिला अन्..
फहादचा पहिला सिनेमा ‘कैयेथुम दूरथ’. १९ व्या वर्षी फहादने या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. फहादचे वडील ए. एम. फासिल हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. परंतु फहादचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला अन् तो आणि त्याच्या वडिलांना टीकेला सामोरं जावं लागलं. पुढे फहादने अभिनय क्षेत्र सोडायचं ठरवलं आणि तो अमेरिकेत गेला. अमेरिकेतही फहाद मित्रांसोबत सिनेमे पाहायचा. एके दिवशी फहादने मित्रांसोबत इरफानचा 'यू होता तो क्या होता' हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शित केलेला.
'यू होता तो क्या होता' सिनेमात इरफानने 'सलीम राजाबली' ही भूमिका साकारली होती. सिनेमातील इरफानचा अभिनय पाहून फहाद खूपच प्रभावित झाला. त्याने मित्रांकडून इरफानबद्दल आणखी माहिती काढली. आणि पुढे अमेरिकेतील इंजिनीयरींगचं शिक्षण सोडून फहादने पुन्हा एकदा भारतात सिनेसृष्टीत स्वतःचं नशीब आजमावलं. फहादचा हा निर्णय त्याच्या करिअरसाठी फायदेशीर ठरला. आज फहादने भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. लवकरच फहाद 'पुष्पा २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.