'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 12:00 PM2024-12-01T12:00:36+5:302024-12-01T12:01:17+5:30
'पुष्पा 2'ची सध्या चांगलीच चर्चा असून सिनेमाच्या पहिल्या शोबद्दल मोठी माहिती समोर आलीय
'पुष्पा 2'ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज आणि रश्मिका मंदानाच्या अदा पाहायला प्रेक्षक पुन्हा सज्ज आहेत. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने लोकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. आता 'पुष्पा 2' सिनेमाची सुद्धा उत्सुकता शिगेला आहे. 'पुष्पा 2'च्या रिलीजला अवघे ४ दिवस बाकी आहेत. अशातच 'पुष्पा 2'चा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी आहे, याबाबतची मोठी अपडेट समोर येतेय.
'पुष्पा 2'चा फर्स्ट डे फर्स्ट शो किती वाजता?
मिळालेल्या माहितीनुसार 'पुष्पा 2' ५ डिसेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. परंतु काही सिनेमागृहांमध्ये एक दिवस आधीच 'पुष्पा 2' रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2'चा पहिला शो अनेक भागांत बुधवारी ४ डिसेंबरला सुरु होणार आहे. म्हणजेच रिलीजच्या एक दिवस आधी ४ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता 'पुष्पा 2'चे शो थिएटरमध्ये सुरु होतील. याशिवाय रिलीजच्या दिवशी अर्थात ५ तारखेला पहाटे चार वाजता 'पुष्पा 2'चा पहिला शो मुंबईत आणि अन्य भागांत सुरु होईल.
'पुष्पा 2'ची उत्सुकता शिगेला
अनेक दिवसांनी एका सिनेमाबद्दल लोकांच्या मनात उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण ५ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' किती लांबीचा असणार याबद्दलही मोठी अपडेट समोर आलीय. 'पुष्पा 2' तब्बल ३ तास २१ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पैसा वसूल मनोरंजन मिळणार यात शंका नाही. 'पुष्पा'चा पहिला भाग २ तास ५८ मिनिटांचा होता. आता 'पुष्पा 2' पहिल्या भागापेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना थिएटरमध्ये नक्कीच मजा येईल यात शंका नाही.