‘क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची’
By Admin | Published: January 18, 2017 02:56 AM2017-01-18T02:56:05+5:302017-01-18T02:56:05+5:30
दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अशी अनेक बिरुदे मिरविणारे केदार शिंदे यांच्या एका नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोग झाले
- प्रियंका लोंढे
दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अशी अनेक बिरुदे मिरविणारे केदार शिंदे यांच्या एका नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोग झाले आहेत. सध्या त्यांचे हे नाटक सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने नाट्यरसिकांवर मोहिनी घातली आहे. याच नाटकाच्या प्रवासासंदर्भात केदार शिंदे यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद...
तुमच्या नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोग झाले आहेत, याबद्दल काय सांगाल?
-: नाटकाचे शंभर प्रयोग होणे ही फार मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी. त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद होत आहे. जेव्हा प्रेक्षक तुमच्या कलाकृतीवर भरभरून प्रेम करतात तेव्हा तुमची जबाबादारी वाढलेली असते. पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी दडपणदेखील येते. सिद्धार्थने या नाटकात अतिशय चांगले काम केले आहे. मी केवळ त्याच्यासाठीच हे नाटक लिहिले होते.
मराठी मालिकेचे दिग्दर्शन तुम्ही पुन्हा कधी करणार आहात?
-: सध्याचे लेखक आणि दिग्दर्शक
अगदी क्लार्कच्या पातळीला आल्याचे मला वाटतेय. कारण एक जण तुम्हाला काहीतरी सांगत असतो आणि तेच तुम्ही जसेच्या तसे उतरवित असता. पुढे कॅमेऱ्यातदेखील तीच कथा आहे तशी मांडली जाते. यामध्ये माझे स्वत:चे असे काही कौशल्य नसते. त्यामुळे मला नेहमीच काहीतरी क्रिएटिव्ह आणि माझ्या स्टाइलने काम करायला आवडेल. मला नाही वाटत, की त्या टीआरपीच्या गणितात माझी स्टाइल कामी येईल.
बरेचसे कलाकार चित्रपटसृष्टीत येण्याची धडपड करीत असतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
-: आम्ही ज्या वेळी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा फारच कमी स्पर्धा होती. पण आता चित्र बदलले आहे. मी माझा प्रवास एकांकिका स्पर्धा ते चित्रपटसृष्टी असा केला आहे. आधी मी पण अॅक्टिंग करण्यासाठीच आलो होतो. मात्र त्यानंतर मी माझ्यातील लेखक-दिग्दर्शकाला
ओळखले आणि आता हेच करायचे असे ठरविले. त्यामुळे सध्याच्या तरुण कलाकारांना मी माझे अनुभव शेअर
करताना हेच सांगेन, की तुम्ही अॅक्टर होऊ शकता का, हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा आणि मगच या क्षेत्रात पाऊल ठेवा.
चित्रपटात अभिनय करताना तुम्ही प्रेक्षकांना कधी दिसणार?
एखाद्या दिग्दर्शकाने जर मला चांगल्या कथेसाठी विचारले तर मी निश्चितच प्रेक्षकांना अभिनय करताना दिसू शकेल. मी माझ्या करिअरची सुरुवात अभिनयापासूनच केली होती. त्यामुळे मला माहितीय, की जेव्हा कलाकार कॅमेऱ्यासमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या मनातील विवंचना, विचार सर्व काही विसरून तो फक्त अभिनय करण्यावरच लक्ष केंद्रित करतो. एखादी चांगली संधी मिळाली तर मी नक्कीच अभिनय करीन.
सध्या रंगभूमीवर तुमची अनेक नाटके सुरू आहेत, पण प्रेक्षकांना तुमचा चित्रपट कधी पाहायला मिळणार?
होय, सध्या नाटकांमध्ये मी जरी व्यस्त असलो, तरीसुद्धा यावर्षी माझा एक मराठी चित्रपट नक्कीच येणार
आहे. हा चित्रपट २०१७ मध्येच प्रदर्शित होईल, याची मी खात्री देतो. त्यामुळे याचवर्षी प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार आहे.