पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि आर. माधवन आहेत कॉलेजपासूनचे फ्रेंड्स, वाचा त्यांच्या मैत्रीविषयी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:33 PM2019-10-02T18:33:59+5:302019-10-02T18:36:02+5:30
पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कॉलेजच्या एका कार्यक्रमात माधवन आणि त्यांच्या मैत्रीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
माधवनचा जन्म हा बिहारमधील जमशेदपूरमध्ये झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये कामाला होते तर आई बँक ऑफ इंडियामध्ये... त्याचे बालपण बिहारमध्ये गेले असले तरी त्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. या कॉलेजमध्ये तो शिक्षक असताना त्याच्यासोबत पोलीस अधीक्षक नांगरे पाटील देखील होते. त्या दोघांची त्या काळापासून मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवन आणि नांगरे पाटील यांनी दोघांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला होता. आर माधवने सांगितले होते की, राजाराम कॉलेजमध्ये असताना मी खूप काही शिकलो. त्या काळात मला भेटलेल्या लोकांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कॉलेजमधील दिवस हे माझ्यासाठी सर्वात चांगले होते. यावेळी माधवनने त्याच्या भाषणाची सुरुवात मराठीत केली होती.
पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमात माधवन आणि त्यांच्या मैत्रीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, आर. माधवन माझ्या कॉलेजमध्ये होता. तो माझा आदर्श होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी होती. तो खूपच मितभाषी तसेच अतिशय शांत होता. आमच्या मुलांमध्ये त्याचे इंग्रजी खूपच चांगले होते. त्यामुळे तो सर्वांना इंग्रजी शिकवत असत. आमचे इंग्रजी बोलताना उच्चार चुकत असतील तर तो आम्हाला लगेचच सांगत असे. त्यामुळे मी त्याला गुरू मानतो.
Thank you for all the love https://t.co/oxtRWcDE9e will always be close to my heart.😘😘😘 https://t.co/p6ar0zHyx4
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) September 19, 2017