रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगतो अस्वच्छतेचा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकरांनी मांडल्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 09:01 AM2023-12-21T09:01:11+5:302023-12-21T09:01:26+5:30

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडतील. रवींद्र नाट्यमंदिराविषयी प्रख्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर आपल्या भेटीला आल्या आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

Rabindra paints an experiment in impurity in the theater - Madhura Velankar | रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगतो अस्वच्छतेचा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकरांनी मांडल्या समस्या

रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगतो अस्वच्छतेचा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकरांनी मांडल्या समस्या

मधुरा वेलणकर, अभिनेत्री 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजवर अनेकदा रवींद्र नाट्यमंदिरमध्ये जाणे झाले. कधी प्रयोगासाठी, तर कधी नाटक पाहण्यासाठी...रवींद्र नाट्यमंदिर हे नाट्यकर्मींचे हक्काचे थिएटर आहे. या थिएटरला फार मोठी परंपरा आहे. इथे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येतात, पण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून हे नाट्यगृह खूपच त्रासदायक असून, नाटकाच्या प्रयोगापेक्षा इथे कायम अस्वच्छतेचा प्रयोग रंगतो. मेकअप रूम, पार्किंगची सोय, कलाकारांना दिली जाणारी वागणूक, आसनव्यवस्था अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा केल्यास प्रेक्षकांची संख्या आणखी वाढू शकेल. सध्या या नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असल्याने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

रवींद्रमधील रंगमंच छान आहे. इथले अकॉस्टिक्सही सुंदर आहे. रसिकांपर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचतो. त्यामुळे प्रयोग करताना वेगळी ऊर्जा मिळते. रसिकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. सेटची ने-आण करताना थोडा त्रास होतो, पण अस्वच्छतेचा मुद्दा खूप त्रासदायक आहे. कोणत्याही स्त्री कलाकारासाठी बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मेकअप रूममध्ये स्वच्छतागृहाची सोय असावी, जी रवींद्रमध्ये आहे; परंतु अस्वच्छतेचे साम्राज्य असते. महिन्यातील काही दिवस स्त्रियांची अडचण असते, तेव्हा तिथे पाणी आणि स्वच्छता असणे अतिशय गरजेचे असते. इथे अनेकदा पाणीच नसते. पाणी गळतीमुळे नऊवारी साडी वर धरून स्वच्छतागृहात जावे लागते. अन्यथा साडी खराब होते. प्रेक्षकांची स्वच्छतागृहेही अतिशय वाईट स्थितीत असून, नाक मुठीत धरून नैसर्गिक विधी उरकावा लागतो. वॉश बेसिनमधील नळ बंद असतात. मराठी माणसाचे नाटकावर प्रचंड प्रेम आहे, पण स्वच्छता नसलेल्या ठिकाणी जाऊन नाट्यप्रयोग बघण्यापेक्षा मॉलमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याला ते प्राधान्य देतात. यामुळे नाटकाचे आणि नाट्यनिर्मात्यांचे नुकसान होते.

 मागे मी रवींद्रमध्ये प्रयोग केला, तेव्हा मेकअप रूममध्ये लॉक नव्हते. त्यामुळे आत एका स्त्रीला आणि बाहेर एका व्यक्तीला उभे ठेवावे लागले. लॉकच्या उघड्या होलमध्ये कापड कोंबून कपडे बदलले. 
 या खूप बेसिक गोष्टी नसतानाही कलाकार ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत नाईलाजास्तव प्रयोग करतात आणि 
दुर्व्यस्थेकडे दुर्लक्ष होते. 
 सुसज्ज मेकअपरूम, स्त्रियांसाठी आत बाथरूम, पाणी आणि स्वच्छता इतकीच माफक 
अपेक्षा आहे.

८० रुपये पार्किंग चार्ज कसले? 
गाडी पार्क करायला आत जाताना दगड आहेत. पार्किंगमध्ये पाणी तुंबलेले असते. गाडी आणताना पाणी उडून गाडी खराब होते. असे असूनही ८० रुपये पार्किंग चार्ज कसला घेता? सोयी-सुविधा नसताना पैसे कसले मागता? पार्किंगमधील रस्त्याचे बांधकाम अर्धवट आहे. कलाकार लवकर येऊन उशिरा जात असल्याने त्यांना जवळचे पार्किंग द्यायला हवे.

नूतनीकरण करताना 
हे लक्षात घ्या...
वॉचमनना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कोणाची गाडी वर लावू द्यायची आणि कोणाची नाही या बेसिक गोष्टीही त्यांना माहिती नसतात. सध्या रवींद्रचे नूतनीकरण सुरू असल्याने जाणकार किंवा कलाकारांचा सल्ला घेतल्यास उत्तम सोयी-सुविधा देता येतील. थिएटर नीट सांभाळल्यास रसिकही येतील आणि नाटकांचा व्यवसायही आणखी वाढेल.

प्रेक्षकांच्या 
बोलक्या प्रतिक्रिया...
नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना पार्किंगमधून वर येणे कठीण होते. त्यांची गाडी वरच पार्क करू द्यावी. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कलाकारांना इतका तरी रिस्पेक्ट मिळावा ही अपेक्षा करणे काय चुकीचे आहे? 
आसनांमधील जागा खूपच कमी आहे. खुर्च्यांची संख्या कमी केल्या तरी चालतील, पण तिथे वावरणे सोपे व्हायला हवे. थिएटर बांधताना किंवा नूतनीकरण करताना या गोष्टींचा विचार करायला हवा.
 

Web Title: Rabindra paints an experiment in impurity in the theater - Madhura Velankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.