शाहरुख नव्हे तर या अभिनेत्यासाठी खास लिहिण्यात आली होती डरची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:02+5:30
या अभिनेत्यानेच नुकतेच एका कार्यक्रमात याविषयी सांगितले.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये नव्वदीच्या दशकातील आशिकी या गाजलेल्या चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे.
आशिकी हा चित्रपट नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. या चित्रपटात राहुल रॉय, अनू अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 30 वर्षं नुकतेच झाले असून याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार आहेत.
द कपिल शर्मा शो मध्ये राहुल, दीपक आणि अनूने या कार्यक्रमाच्या टीमसोबत खूप मजा-मस्ती केली. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचे किस्से देखील सांगितले. तसेच राहुल रॉयने या चित्रपटातील काही गाणी देखील सादर केली. या कार्यक्रमात राहुलने हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा एक भन्नाट किस्सा सांगितला. तो म्हणाला, “‘आशिकी’ नंतर पहिले सहा महिने माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. पण त्यानंतर अचानक मला 49 चित्रपटांसाठी विचारण्यात आले. त्यातील कोणता चित्रपट स्वीकारायचा आणि कोणत्या चित्रपटाला नकार द्यायचा हेच कळत नव्हते. मला आठवते यश चोप्रा यांनी मला पटकथा ऐकवण्यासाठी बोलावले होते. मी इतर चित्रपटांमध्ये खूप व्यग्र होतो आणि माझे बरेचसे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे निर्माते माझ्या तारखांसाठी झगडत होते आणि त्याचमुळे मी त्यांची ऑफर घेऊ शकलो नाही आणि तो चित्रपट होता ‘डर’, जो नंतर शाहरुख खानकडे गेला आणि त्याची कारकीर्द आकाराला आली. त्याची राहुल ही व्यक्तिरेखा मला डोक्यात ठेवून लिहिली गेली होती. तो चित्रपट नाकारल्याबद्दल मला अजूनही खंत वाटते.”