आॅक्टोबर हीटवर चित्रपटांचा पाऊस!

By Admin | Published: October 8, 2015 05:28 AM2015-10-08T05:28:15+5:302015-10-08T05:28:15+5:30

गणेशोत्सवाच्या काळात गायब झालेल्या मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा जोमाने डोके वर काढले आहे. अनेक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या रांगेत आहेत. सध्या आॅक्टोबर हीटची

Rainfall films on October Heat! | आॅक्टोबर हीटवर चित्रपटांचा पाऊस!

आॅक्टोबर हीटवर चित्रपटांचा पाऊस!

googlenewsNext

- राज चिंचणकर

गणेशोत्सवाच्या काळात गायब झालेल्या मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा जोमाने डोके वर काढले आहे. अनेक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या रांगेत आहेत. सध्या आॅक्टोबर हीटची चर्चा असताना, चित्रपटगृहांवर मात्र चित्रपटांचा दमदार पाऊस पडणार आहे. या पावसाला ‘दगडी चाळ’ आणि ‘मुंगळा’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून आधीच सुरुवात झाली आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत चित्रपटांची ही बरसात अधिकच धुवाधार होत जाणार आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित झाले तरी पुढच्या चार आठवड्यांत मिळून जवळपास ११ चित्रपट पडद्यावर येण्याच्या तयारीत आहेत. संतोष जुवेकरला मोटारबाइकवर थरार करायला लावणारा ‘बायकर्स अड्डा’ हा चित्रपट येत्या ९ तारखेला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अभिनेता विजय पाटकर दिग्दर्शित आणि प्रसाद ओक व अदिती सारंगधर यांची भूमिका असलेला ‘मोहोर’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. पण त्याचे प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलण्यात आले आहे. तीच गत ‘डोम’ या चित्रपटाची झाली आहे. स्मशानकार्य बजावणाऱ्या डोम समाजावर आधारित असलेला हा चित्रपटही आता ९ ऐवजी १६ तारखेला पडद्यावर येणार असल्याची चर्चा आहे.
पण त्यामुळे १६ तारखेच्या शुक्रवारी चित्रपटगृहांवर चार चित्रपट एकत्र दाखल होतील. ‘मोहोर’ आणि ‘डोम’ या चित्रपटांसह अभिनेता अतुल कुलकर्णी निर्मित, भलीमोठी स्टारकास्ट असलेला ‘राजवाडे अ‍ॅन्ड सन्स’, तसेच राकेश बापट, राजश्री लांडगे, माधव देवचक्के यांच्या भूमिका असलेला ‘सिटीझन’ यांच्यात या दिवशी चौफेर सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आॅक्टोबरच्या चौथ्या शुक्रवारी, म्हणजे २३ तारखेला तर चित्रपटगृहांवर धुमश्चक्री निर्माण होणार आहे. कारण राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेला ‘ख्वाडा’, प्रथमेश सावंतची महत्त्वाची भूमिका असलेला ‘उर्फी’, अनेक कलाकारांना एकत्र आणणारा व राजपाल यादवची प्रमुख भूमिका असलेला ‘दगडाबाईची चाळ’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित व मकरंद अनासपुरे, भरत जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक आदी कलावंत असलेला ‘शासन’, तसेच ‘ठण ठण गोपाळ’ असे चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, हिंदी नाव असलेला ‘बेदर्दी’ हा मराठी चित्रपट पडद्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एवढे सगळे चित्रपट या एकाच महिन्यात प्रदर्शित होत असल्याने त्यांच्यात आपापसांत स्पर्धा होणार हे निश्चित आहे. या तारखांमध्ये काही फेरफार होऊन यातल्या काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेल्यास मात्र आॅक्टोबर महिन्यावरचा ताण कमी होऊ शकेल. मात्र तशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. साहजिकच उन्हाने काहिली होत असताना या महिन्यात पडणाऱ्या चित्रपटांच्या या पावसात चित्रपट रसिकांसाठी यथेच्छ भिजण्याची सोय झाली आहे. या चित्रपटांतील कोणते चित्रपट ‘हिट’ करायचे हेदेखील आता पूर्णपणे रसिकांच्या हाती आहे.

Web Title: Rainfall films on October Heat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.