राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:48 PM2022-04-01T13:48:53+5:302022-04-01T13:49:54+5:30
Tirangaa:दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या 'तिरंगा' चित्रपटात राजकुमार आणि नाना पाटेकर हे एकमेकांना तोडीस तोड असलेले कलाकार झळकले होते.
नाना पाटेकर (Nana Patekar) आणि राजकुमार (Rajkumar) यांचा सुपरहिट ठरलेला तिरंगा (Tirangaa) हा चित्रपट साऱ्यांच्याच स्मरणात असेल. हा चित्रपट विविध कारणांसाठी चर्चेत राहिला.या चित्रपटातील किस्से, आठवणी आजही चाहते आवडीने वाचतात, ऐकतात. यातलाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकरांऐवजी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ही भूमिका प्रथम ऑफर झाली होती. मात्र, केवळ राजकुमार या चित्रपटात असल्यामुळे त्यांनी या सुपरहिट चित्रपटाची ऑफर नाकारली.
दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या 'तिरंगा' चित्रपटात राजकुमार आणि नाना पाटेकर हे एकमेकांना तोडीस तोड असलेले कलाकार झळकले होते. मात्र, या चित्रपटात प्रथम रजनीकांत यांची निवड करण्यात आली होती. मात्र, राजकुमार यांच्या स्वभावामुळे रजनीकांत यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतं. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनीच एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
मेहुल कुमार यांनी 'तिरंगा'साठी प्रथम राजकुमार यांची निवड केली होती. पण, राजकुमारसोबतच त्यांना आणखी एका अभिनेत्याची लीड रोलमध्ये निवड करायची होती. यासाठी त्यांनी रजनीकांत यांना ही भूमिका ऑफर केली होती. पण, रजनीकांत यांनी मेहुल कुमार यांना स्पष्टपणे नकार कळवला होता.
राजकुमार आणि माझा स्वभाव भलेही वेगवेगळे असतील. मात्र, माफ करा मी हा चित्रपट करु शकत नाही. आपण पुढे केव्हातरी पाहुयात.विशेष म्हणजे रजनीकांत यांचा नकार मिळाल्यावर दिग्दर्शकांनी नसिरुद्दीन शाह यांना हा चित्रपट ऑफर केला. मात्र, त्यांनीदेखील हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी नाना पाटेकरांना हा चित्रपट ऑफर केला.
सुरुवातीला राजकुमारचं नाव ऐकून नाना पाटेकर यांनीही चित्रपटासाठी नकार दिला होता. मी केवळ ८ दिवसच काम करतो. मी कमर्शिअल चित्रपट करत नाही, असं कारण नाना पाटेकरांनी दिलं होतं. मात्र, मेहुल कुमार यांनी अनेक मिन्नतवाऱ्या केल्यानंतर नाना पाटेकरांनी या चित्रपटासाठी होकार दिला. मात्र, नाना पाटेकरांची निवड केल्यामुळे राजकुमार नाराज झाले होते.
दरम्यान, नाना पाटेकर सेटवर कायम शिवीगाळ करतो मग त्याला या चित्रपटात का घेतलं असा प्रश्न राजकुमारने उपस्थित केला होता. मात्र, मेहुल कुमार यांनी कशीबशी त्यांची समजूत काढली. विशेष म्हणजे चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण होईपर्यंत सेटवर राजकुमार आणि नाना पाटेकर यांनी फार कमी वेळा एकमेकांशी संवाद साधला. परंतु, हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला.