डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे
By तेजल गावडे | Published: December 26, 2020 11:40 AM2020-12-26T11:40:18+5:302020-12-26T11:40:49+5:30
रजनीकांत यांची तब्येत अचानक शुक्रवारी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दाक्षिणात्य आणि बॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत अचानक शुक्रवारी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांच्या ब्लड प्रेशरमध्ये चढउतार आला होता जो कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर त्यांना औषधे देत आहेत. हैदराबादमधील अपोलो रुग्णालयानुसार, डॉक्टरांच्या देखरेखीखाली रजनीकांत यांना ठेवण्यात आले आहे. रात्रभर त्यांच्या ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवण्यात आले त्यानंतर आता त्याची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. रजनीकांत यांचा ब्लड प्रेशर जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही. हैदराबादमध्ये रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होते तेव्हा सेटवरील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
रजनीकांत यांना आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते जिथे त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये चढउतार पहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांना बरे वाटावे म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. तर दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनीदेखील रजनीकांत यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली आहे.
रजनीकांत यांचा चित्रपट अन्नाथेच्या शूटिंग सेटवर काही लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ज्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. रजनीकांत यांची २२ डिसेंबर रोजी कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती पण ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. पण त्यांची तब्येत शुक्रवारी अचानक खराब झाली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये चढउतार आहे. त्यासाठी त्यांनी औषधे दिली जात आहेत. रजनीकांत यांच्यासोबत त्यांची मुलगी सौंदर्या रुग्णालयात उपस्थित आहे.