Raju Shrivastava 10 Unknown Facts: राजू श्रीवास्तव यांच्या खऱ्या नावापासून ते 'शक्तिमान'मधील त्यांच्या भूमिकेपर्यंत... जाणून घ्या १० रंजक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:51 PM2022-09-21T13:51:57+5:302022-09-21T13:53:40+5:30
राजू श्रीवास्तव यांनी १९८८ साली गाजलेल्या हिंदी चित्रपटातही काम केले होते
Raju Shrivastava 10 Unknown Facts: कलाक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वर्कआऊट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना १० ऑगस्टला दाखल करण्यात आले. त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती, पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
राजू श्रीवास्तव यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यासाठी त्यांनी आपले नावही बदलले. जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या १० रंजक गोष्टी-
1. राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी झाला. त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. ते कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.
2. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे लोकप्रिय कवी होते. त्यांना प्रेमाने 'बालाई काका' (Balai Kaka) म्हणत.
3. राजू यांनी 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला, त्यांना त्या शो ने प्रसिद्धी मिळवून दिली.
4. १९८८ मध्ये अनिल कपूरच्या 'तेजाब' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
5. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गजोधर नावाचे काल्पनिक पात्र साकारले. तेव्हापासून चाहते त्यांना 'गजोधर भैय्या' म्हणत आहेत.
6. १९९४ मध्ये शेखर सुमनच्या 'देख भाई देख' या कॉमेडी मालिकेतही त्यांनी एक छोटी भूमिका केली होती.
7. कॉमेडियन म्हणून नंतर नावलौकिक मिळालेल्या राजू श्रीवास्तव यांनी भारताच्या आवडत्या सुपरहिरो मालिका 'शक्तिमान' मध्येही काम केले होते. शक्तिमान मध्ये कथा सांगणाऱ्या काकांची भूमिका राजू यांनी केली होती.
8. राजू श्रीवास्तव यांनी अभिनेता होण्यापूर्वी त्याच्या स्टँड-अप कॉमेडी परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे प्रेम मिळवले.
9. २०१३ मध्ये झालेल्या 'नच बलिए सीझन 6' मध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता.
10. एकेकाळी भारतातील सर्वाधिक मानधन मिळणारे कॉमेडियन असा त्यांचा नावलौकिक होता.