Rakhi Sawant: 'मिस्टर चड्डा...माझं नाव घेतलंत तर खबरदार...!'; 'आप' नेत्यावर का भडकली राखी सावंत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:08 AM2021-09-18T11:08:39+5:302021-09-18T11:09:19+5:30
Rakhi Sawant: ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या हटके आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पण यावेळी राखी सावंत काहीच न केल्यामुळंही चर्चेचा विषय ठरली आहे.
Rakhi Sawant: ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या हटके आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पण यावेळी राखी सावंत काहीच न केल्यामुळंही चर्चेचा विषय ठरली आहे. पंजाबच्या राजकारणात राखी सावंतचं नाव सध्या केंद्रस्थानी आलं आहे. आम आदम पक्षाचे नेते राघव चड्डा यांच्या एका विधानानं राखी सावंत चर्चेत आली आहे. चड्डा यांनी पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत असं संबोधलं आहे.
राजकारणात दोन नेत्यांमधील वादात राखी सावंतचं नाव घेण्यात आल्यामुळं त्यावर जोरदार टीका-टिप्पणी देखील केली जात आहे. आता राखी सावंतचं नाव घेतलं गेलं आणि ती काहीच प्रतिक्रिया देणार नाही असं होणार नाही. राखी सावंतनं आपलं नाव राजकीय भांडणात घेण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राखीनं राघव चड्डा यांना थेट इशाराच दिला आहे. "माझ्यापासून तुम्ही दूरच राहा. मिस्टर चड्डा माझं नाव पुन्हा घेतलात तर खबरदार, मी आताही ट्रेडिंगमध्ये आहे. मला असं तसं समजू नका", असा इशारा राखी सावंतनं दिला आहे.
राखी सावंतला पती रितेशनंही दिला पाठिंबा
राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यात तिनं पंजाबमधील राजकारणाचा उल्लेख केला आहे. तिनं एका ट्विटचा स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. यात रितेश नावाच्या एका व्यक्तीनं राखीला पाठिंबा देत एक ट्विट केल्याचं पाहायला मिळतं. राखीनं माझा पती रितेशनं पंजाबच्या राजकारण्यांना प्रत्युत्तर दिलंय असं म्हटलं आहे. राघव चड्डा, पंजाब पोलीस, काँग्रेस, आम आदमी पक्ष, भाजपाच्या ट्विटर हँडलला टॅग करत रितेश यानं "राजकारणासाठी तुम्ही कुणाची प्रतिमा मलीन करू शकत नाही. कृपया आपल्या आमदाराला योग्य शिकवणी द्या. जर मी शिकवणी द्यायला सुरुवात केली तर आप पक्ष कुठेच दिसणार नाही", असा थेट इशारा देणारं ट्विट केलं आहे. हेच ट्विट राखीनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
राखीच्या दाव्यानुसार ट्विट करणारा रितेश नावाचा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून तिचा पती आहे. आता यात नेमकं किती सत्य आहे हे राखीच सांगू शकेल. पण आपल्याबाबत काळजी व्यक्त करुन ठामपणे भूमिका मांडल्याबद्दल राखीनं आनंद व्यक्त केला आहे.