अभिनेते चंद्रशेखर कधीकाळी करत होते चौकीदारी, हिरो बनण्यासाठी 40 रूपये घेऊन गाठली होती मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:59 AM2021-06-16T10:59:39+5:302021-06-16T11:04:02+5:30
Actor Chandrashekhar passed away : ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामायण या लोकप्रिय मालिकेत महाराज दशरथ यांचे महामंत्री आर्य सुमंत यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य (actor Chandrashekhar ) यांचे आज सकाळी निधन झाले. (actor Chandrashekhar passed away) वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 7 जुलै 1923 साली जन्मलेले चंद्रशेखर यांचे वडिल एका सरकारी रूग्णालयात डॉक्टर होते. चंद्रशेखर लहान असतानाच आई सोडून गेली. यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. घरची परिस्थिती बिकट असल्याने चंद्रशेखर यांना शाळा सोडावी लागली आणि यानंतर ते आपल्या आजीकडे बेंगळुरू येथे गेले. वाढत्या वयासोबत पोट भरण्यासाठी चंद्रशेखर यांना चौकीदारी करावी लागली. ट्रॉली ओढण्याचे कामही त्यांनी केले. 1942 साली चंद्रशेखर यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला होता.
40 रूपये घेऊन आले होते मुंबईत
चंद्रशेखर चित्रपटांत कसे आले होते, याची कहाणी इंटरेस्टिंग आहे. मिलमध्ये नोकरी करत असताना, मित्रांनी त्यांना चित्रपटात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. मित्रांचा हा सल्ला मानून चंद्रशेखर यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला होता. खिशात फक्त 40 रूपये होते. ते 40 रूपये घेऊन चंद्रशेखर यांनी मुंबईत पाऊल ठेवले आणि इथून त्यांच्या नव्या संघर्षाला सुरुवात झाली होती. चित्रपटात काम मिळावे म्हणून त्यांनी अनेक स्टुडिओच्या पायºया झिजवल्या. अखेर एका चित्रपटातील पार्टी सीनमध्ये त्यांना काही सेकंदाची भूमिका मिळाली. पण पुढे मेहनत फळास आली आणि ज्युनिअर आर्टिस्टच्या भूमिका त्यांना मिळाल्या.पुढे अनेक सिनेमात ते हिरो म्हणून झळकले. व्ही शांतराम यांच्या ‘सुरंग’ या सिनेमात त्यांना हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळाला होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मस्ताना, बरादरी, काली टोपी लाल रूमाल, स्ट्रीट सिंगर अशा अनेक सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. अर्थात काही वर्षांनंतर हिरोच्या भूमिका मिळेनाशा झाल्यात आणि चंद्रशेखर यांनी चरित्र भूमिका करायला सुरूवात केली. कटी पतंग, हम तुम और वो, अजनबी, महबूबा, अलग अलग, शक्ती, शराबी, डिस्को डान्सर, नमक हलाल, द बर्निंग ट्रेन अशा हिट सिनेमात त्यांनी चरित्र भूमिका जिवंत केल्यात.
‘रामायण’ या मालिकेतील सर्वात वयोवृद्ध कलाकार
‘रामायण’ या मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेतील ते सर्वात वयोवृद्ध कलाकार होते. त्यावेळी त्यांचे वय 65 वर्ष होते. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती.
वयाच्या 13 व्या वर्षीच चंद्रशेखर यांचे लग्न झाले होते. त्यांची मुलगी रेनू अरोरा एक पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मुलगा अशोक चंदीगड येथे तर अन्य एक मुलगा अनिल अमेरिकेत स्थायिक आहेत. टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा हा चंद्रशेखर यांचा नातू आहे.