घोडीवर बसण्याआधीच आपल्या लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:17 PM2022-04-13T12:17:21+5:302022-04-13T12:18:04+5:30
Ranbir - Alia wedding : रणबीर कपूरचे दिवंगत वडील अभिनेते ऋषी कपूर यांनी 'बॉबी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमानंतर ते रातोरात स्टार बनले होते.
Ranbir - Alia wedding : ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) नेहमीच बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कपलमध्ये राहतील. ऋषी कपूर आणि नीतू कपूर प्रमाणेच आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या प्रेमकहाणीचा नव्या अध्याय लिहणार आहेत. दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नादरम्यान ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्याही लग्नाचे किस्से समोर येत आहेत.
रणबीर कपूरचे दिवंगत वडील अभिनेते ऋषी कपूर यांनी 'बॉबी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमानंतर ते रातोरात स्टार बनले होते. त्यावेळी तरूणींमध्ये ऋषी कपूर यांची मोठी क्रेझ बघायला मिळत होती. पण ऋषी कपूर हे नीतू कपूरच्या प्रेमात पडले होते. दोघांनी जेव्हा डेटिंग सुरू केलं तेव्हा ऋषी कपूर एक यशस्वी अभिनेते होते. दोघांची पडद्यावरील आणि रिअल लाइफमधील केमिस्ट्री सर्वांना आवडत होती. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केलं.
लग्नाच्या दिवशी बेशुद्ध झाले होते ऋषी कपूर
कपूर खानदानातील या लग्नात देशासोबतच परदेशातीलही अनेक मान्यवर आले होते. पण यादरम्यान असं काही झालं की, सगळे घाबरले होते. एका मुलाखतीत नीतू कपूर यांनी सांगितलं होतं की, लग्नादरम्यान ऋषी कपूर आणि त्या स्वत: बेशुद्ध झाल्या होत्या. दोघांचंही बेशुद्ध पडण्याचं कारण वेगवेगळं होतं.
नीतू कपूर यांनी सांगितलं होतं की, मी आणि ऋषी कपूर आमच्या लग्नात बेशुद्ध झालो होतो. माझा लेहंगा फार हेवी होता आणि लग्नात खूप जास्त लोकही आले होते. माझ्यासाठी हे सगळं हॅंडल करणं फार अवघड होतं. माझे पती ऋषी कपूर लोकांची गर्दी पाहून बेशुद्ध पडले होते. ऋषी कपूर घोडीवर बसण्याआधीच बेशुद्ध झाले होते. नंतर आम्ही दोघेही ठीक झालो. तेव्हा आमचं लग्न झालं.