Brahmastra Movie Review: पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 09:43 AM2022-09-10T09:43:41+5:302022-09-10T10:36:08+5:30
Brahmastra Movie Review: रणबीर कपूर आणि आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'नं अपेक्षाभंग न करतां आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळवलं आहे.
कलाकार : अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, नागार्जुन, शाहरुख खान, आलिया भट्ट, मौनी रॉय, डिंपल कपाडीया, सौरव गुर्जर, गुरफतेह पिरझादा
दिग्दर्शक : अयान मुखर्जी
निर्माता : करण जोहर, अपूर्वा मेहता, नमित मल्होत्रा, रणबीर कपूर, मरिज्क डिसोझा, अयान मुखर्जी
शैली : फँटसी अॅक्शन अॅडव्हेंचर
कालावधी : दोन तास ४७ मिनिटे
दर्जा : साडेतीन स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे
बिग बजेट आणि तूफान पब्लिसिटीमुळं या चित्रपटाबाबतच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. मागील काही दिवसांपासून रिलीज झालेल्या चित्रपटांचा कित्ता गिरवत अपेक्षाभंग न करता 'ब्रह्मास्त्र'नं आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळवलं आहे. या चित्रपटाच्या रूपात आपण खूप मोठं शिवधनुष्य उचलल्याची जाणीव दिग्दर्शक अयान मुखर्जीलाही होती. त्यानुसार त्यानं प्रचंड मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे, जो अस्त्र आणि शास्त्रांची सांगड घालत रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रेमास्त्राची कथा सांगणारा आहे.
कथानक : कथा मुंबईतील शिवा (रणबीर कपूर) नावाच्या डीजेभोवती गुंफली आहे. आई-वडीलांविना वाढलेला शिवा अनाथ मुलांसाठी जणू देवदूतच असतो. दसऱ्याच्या मुहूर्तावरील रावणवधाच्या सोहळ्यात शिवाची नजर इशावर (आलिया भट) पडते आणि पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. शिवाला काही दृश्ये दिसत असतात. कोणती तरी अनामिक शक्ती शिवाकडे असते. आपल्याशी निगडीत असलेल्या काही गोष्टी अन्य कोणत्या तरी ठिकाणी घडत असल्याचं शिवाला दिव्यदृष्टीमुळे दिसत असतं, पण ते नेमकं काय याचा उलगडा त्याला होत नसतो. ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी सायंटिस्ट मोहन भार्गवच्या (शाहरुख खान) मागावर क्वीन ऑफ डार्कनेस जुनून (मौनी रॅाय) आणि तिचे दोन हस्तक असतात. ते बनारसमधील आर्टिस्ट अनिष शेट्टीच्या (नागार्जुन) मागे जातात. हे सर्व शिवाला दिसत असतं. ब्रह्मांशच्या रक्षणकर्त्यांच्या गुरूंची (अमिताभ बच्चन) भेट झाल्यावर शिवाला हळूहळू भूत आणि वर्तमान काळातील गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.
लेखन-दिग्दर्शन : सुरुवातीला पटकथेची मांडणी थोडी विस्कळीत वाटते, पण नंतर घडणाऱ्या घटनांमागील कारणं समजल्यावर उलगडा होतो. लेखनासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत अयाननं घेतलेली मेहनत जाणवते.
४१० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा चित्रपट भारतीय पुराणांची साक्ष देत आजच्या युगातील कथानक सादर करणारा आहे. अस्त्रांच्या अनोख्या विश्वात घेऊन जात मनोरंजनाचं पॅकेज देणारा आहे. सुरुवातीच्या काळातील सायंटिस्टचा भाग शिवाच्या जीवनाशी कनेक्ट करताना थोडी गफलत झाल्यासारखी वाटते. पहिलं गाणंही विशेष प्रभावी नाही. इतर गाणी चांगली झाली आहेत. मध्यंतरानंतर चित्रपटाची गती मंदावल्यानं कथानक काहीसं थबकतं. त्यामुळे लांबी वाढली आहे. पुराणांतील आणि आध्यात्मात सांगितलेले सिद्धांत आधुनिक पद्धतीनं मांडले आहेत. 'गुरूविण ज्ञान नकळे नि:संदेह...' यानुसार गुरूंची भेट झाल्यावरच शिवाला अंर्तशक्तीची जाणीव होते. गुरूंमुळे त्याला भूतकाळ समजतो आणि भविष्यात काय करायचं आहे याची जाणीव होते. पूर्वीच्या काळातील वानरास्त्र, नंदीअस्त्र, अग्नीअस्त्र, पर्जंन्यअस्त्र, मोहिनीअस्त्र अशा विविध अस्त्रांची ओळख करून देण्यात आली आहे. हॅालिवूडशी तुलना करण्याजोगे व्हीएफएक्स नसले तरी नक्कीच अपेक्षा पूर्ण करणारे आहेत. सर्व अस्त्रांपेक्षा प्रेमाचं अस्त्र किती प्रभावी आहे हे अखेरीस दाखवण्यात आलं आहे. कॅमेरावर्क, कोरिओग्राफी, कॅास्च्युम्स, गेटअप्स चांगले आहेत. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शिवाची आहे, तर दुसऱ्या भागात देवची म्हणजे त्याच्या वडीलांची कथा असेल.
अभिनय : रणबीर कपूरनं शिवाच्या कॅरेक्टरसाठी खूप मेहनत घेतली आहे. शिवाची भूमिका रणवीरनं समरस होऊन साकारली आहे. आलिया भटनंही शिवाला शेवटपर्यंत साथ देणारी वेगळ्या प्रकारची इशा साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत तरीही काहीसा वेगळा वाटावा असा संयमित गुरू साकारला आहे. मौनी रॅायला खूप मोठा ब्रेक मिळाला असून, तिनं मिळालेल्या संधीचं सोनं करत आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दिसलेला शाहरुख खान त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का देणारा ठरेल. नागार्जुनच्या कॅरेक्टरला फार वाव नव्हता, पण त्यानं ते चांगल्या प्रकारे साकारलं आहे. डिंपल कपाडीयांची व्यक्तिरेखा असून आणि नसून सारखीच आहे. गुरुंकडून दीक्षा घेणाऱ्या ब्रह्मांशच्या नवीन सदस्यांनीही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : अस्त्र आणि शास्त्रांची सांगड घालून चित्रपटाला दिलेला आधुनिकतेचा टच, कलाकारांचा अभिनय, व्हिएफएक्स, गाणी
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, संकलन, सुरुवातीला आणि मध्यंतरानंतर गती थोडीशी मंद होणं, शिवा-इशाच्या दुसऱ्या भेटीतील दृश्ये
थोडक्यात : तरुण दिग्दर्शकानं केलेल्या या चांगल्या प्रयत्नाला सिनेमागृहात जाऊन दाद देणं गरजेचं आहे. हॅालिवूडशी तुलना करण्याइतपत हा प्रयत्न कौतुकास्पद नसला तरी एकदा पाहण्याजोगा नक्कीच आहे.