रणबीर कपूर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच करणार ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:23 PM2019-03-26T18:23:03+5:302019-03-26T18:24:35+5:30
गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या मल्टीस्टारर ‘शमशेरा’ या चित्रपटचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
रणबीर कपूरने गेल्या काही वर्षांत तो एक चांगला अभिनेता असल्याचे त्याच्या चित्रपटांमधून सिद्ध केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संजू या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्याला नुकताच फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. आता रणबीर प्रेक्षकांना ब्रम्हास्त्र या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासोबतच रणबीर सध्या शमशेरा या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे.
गेल्यावर्षी रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या मल्टीस्टारर ‘शमशेरा’ या चित्रपटचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. या चित्रपटात रणबीर एका डाकूच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातील त्याचा लूक हा खूपच वेगळा असणार आहे. आता या चित्रपटाच्या संबंधित एक नवीन बातमी आली आहे. मीड-डे या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार रणबीर या चित्रपटात डबल रोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तो वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळातील असून एका डाकूची टोळी आपल्या हक्कांशी लढण्यासाठी काय काय करते हे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रणबीर या चित्रपटात नायकाची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. तो दोन्ही भूमिकांसाठी सध्या एकत्र चित्रीकरण करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीरच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार आहे. करण मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या अॅक्शनपटात संजय दत्त निगेटीव्ह रोलमध्ये असून रणबीर आणि संजयची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे.
रणबीर कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होऊन साडे अकरा वर्षं झाली आहेत. सावरिया हा त्याचा पहिला चित्रपट होता. पण त्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत कधीच डबल रोल साकारला नव्हता. त्यामुळे त्याचा शमशेरा हा चित्रपट त्याच्या फॅन्ससाठी एक पर्वणीच ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.