‘तमाशा’तील रणबीर-दीपिकाचा सुसंस्कृत चेहरा
By Admin | Published: November 23, 2015 02:36 AM2015-11-23T02:36:10+5:302015-11-23T02:36:10+5:30
‘तमाशा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही आघाडीची जोडी ‘लोकमत’च्या मुंबईतील कार्यालयात थडकली आणि एका अनोख्या भेटीचा अध्याय रंगला.
मुंबई : ‘तमाशा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही आघाडीची जोडी ‘लोकमत’च्या मुंबईतील कार्यालयात थडकली आणि एका अनोख्या भेटीचा अध्याय रंगला. ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा व रणबीर-दीपिका यांची छोटेखानी भेट संस्मरणीय ठरली. त्यात खा. दर्डांनी कपूर खानदानाच्या तीन पिढ्यांशी जडलेला ऋणानुबंध उलगडला, तर ‘तमाशा’तील रणबीर-दीपिकाचा शालीन सुसंस्कृत चेहराही त्यांच्या वर्तनातून लख्ख उजळून निघाला.
रणबीरला पाहताक्षणी खा. दर्डा यांच्या मनात त्याआधीच्या कपूर घराण्यातील तीन पिढ्यांशी जडलेल्या नात्याच्या आठवणी दाटल्या. रणबीर-दीपिकाशी झालेल्या ओघवत्या गप्पांमध्ये त्यांनी त्या मनमोकळेपणे जागवल्याही. ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्याशी दाट अनुबंध होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने बाबुजींनी पृथ्वीराज यांना यवतमाळला आमंत्रित केले होते आणि तेही यवतमाळला येऊन पाहुणचार घेऊन गेले होते. दमदार व्यक्तित्व आणि भरदार आवाजाचे वरदान लाभलेले पृथ्वीराज कपूर तर स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनासाठी हजर राहिले होते. ही साधारण १९५०च्या दशकाच्या मध्यातील गोष्ट. ‘पैसा’ नावाचं नाटकही ते बाबुजींच्या आमंत्रणाखातर यवतमाळला घेऊन आले होते. नेता-अभिनेता ही पाहुण्यांच्या यादीतील कल्पक सांगड अनेक वर्षे चर्चेत राहिली... खा. दर्डा भरभरून बोलत होते... राज कपूरही बाबुजींच्या चांगल्या संपर्कात होते. मुंबईत चर्चगेटच्या गेलॉर्ड रेस्टॉरंटमध्ये ते आले की तिथूनच जवळ असलेल्या लीली कोर्टमधील आमच्या घरी ते आवर्जून जायचे. या साऱ्या गोष्टी रणबीर थक्क होऊन ऐकत होता.
टीव्हीचा छोटा पडदा भारतात मनोरंजनाच्या क्षेत्रातील क्रांती घडवू पाहात असताना यवतमाळमध्ये आचार्य इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जाहीरपणे दाखविलेल्या टीव्हीची आठवण या दोन्ही स्टार्सनाही भावली.
खा. दर्डा रणबीरला सांगत होते... ऋषी कपूर म्हणजे तुझ्या वडिलांशी माझा स्नेह जुना आहे. कबड्डीसाठी मी त्यांना यवतमाळला आणत असे. ते म्हणाले, तुझ्या आईचे म्हणजे नितू सिंगांचे जे. पी. सिंघल यांनी काढलेले छायाचित्र ‘लोकमत’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केले होते. ते तुझ्या आईचे प्रसिद्ध झालेले पहिले छायाचित्र; हे ऐकता रणबीरच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कपूर घराण्यातील पुढील पिढ्यांमधील अनेकांचा जन्म ज्या प्रख्यात प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सोनावाला यांच्या देखरेखीत झाला त्यांचा आम्ही
सत्कार केला त्या वेळी या अशा
अनेक आठवणींना उजाळा मिळाला होता; हेही खा. दर्डा यांनी आवर्जून सांगितले.
दीपिकाच्या उपस्थितीमुळे साहजिकच खेळाच्या आवडीचा विषय निघाला. खा. दर्डा यांनी या दोघांनाही विचारले, तुम्हाला खेळात रुची आहे की नाही? दीपिकाला तर घरातच बॅडमिंटनचे बाळकडू मिळालेले. शिवाय रणबीरनेही त्याची फुटबॉलमधील रुची स्पष्ट केली. फुटबॉलचा विषय निघाला आणि खा. दर्डा या नव्या पिढीच्या कलावंतांना स्मरणरंजनाच्या बोटाला धरून थेट लंडनला घेऊन गेले. ते या जोडीला सांगत होते... मी, उद्योगपती एल. एन. मित्तल आणि डेव्हिड बेकहॅम लंडनमधील चायना टँग रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना अनेक जण डेव्हिडला येऊन भेटत होते. त्याची स्वाक्षरी घेत होते. त्याच्या हातावर टॅटू होता. हा कोण, हे मला काही उमजत नव्हते. शेवटी कळले फुटबॉलजगतात यशश्री ज्याच्या पायाची दासी होती तो हा खेळाडू होता... नव्या पिढीला ‘बेन्ड इट लाइक’ या बिरूदाने माहीत असलेला... डेव्हिड बेकहॅम! मग मीही त्याची स्वाक्षरी घेतली हे सांगणे न लगे!
अर्थात मोठेपणा आणि साधेपणाशी रणबीर आणि दीपिकाचे घरातूनच नाते आहे. त्याचा प्रत्यय दोघांनीही ‘लोकमत’च्या भेटीत दिला. बॅडमिंटनच्या प्रांतात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर विजयातून स्वाभिमानाची चव चाखायला देणारे प्रकाश पदुकोण हे दीपिकाचे वडील. त्यांच्याविषयीच्या आणि एकूणच क्रीडाविषयक आस्थेचा विषय काढून खा. दर्डा दीपिकाशी मराठीत संवाद साधू लागले. तेव्हा तिने सांगितले की, मला मराठी नीट येत नाही. मी तुमच्या नागपूरच्या घरी दोन तास होते, तेव्हा झालेल्या गप्पा हिंदीत रंगल्या होत्या. ‘लोकमत दीपोत्सव’च्या विक्रमी खपाची गोष्ट ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्यमिश्रित कौतुकाचे भाव विरळा होते. तिची मुलाखत असलेल्या या अंकाच्या काही प्रतीही तिने आवर्जून स्वत:साठी घेतल्या.
खा. दर्डा यांच्या दालनात शिरताक्षणी रणबीर आणि दीपिका या दोघांनीही अदबीने वाकून नमस्कार केला. बाहेर पडतानाही याच कृतीची पुनरावृत्ती करण्यास ते विसरले नाहीत.
कपूर खानदान
आणि दर्डा परिवाराच्या ऋणानुबंधाचे पदर उलगडल्यानंतर खा. दर्डा यांच्या दालनातून बाहेर पडताक्षणी रणबीरने या भेटीचा संक्षिप्त वृत्तान्त वडील - ऋषी कपूर यांना कळविला. परिणामी, लागलीच ऋषी यांनी खा. दर्डा यांना फोन करून रणबीरशी झालेल्या भेटीविषयी आणि त्याला दिलेल्या शुभेच्छांविषयी समाधान व्यक्त केले.
दीपिकालाही खा. दर्डा यांनी तिच्या ‘तमाशा’प्रमाणेच ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटासाठीही भरभरून शुभेच्छा दिल्या, शिवाय या चित्रपटाच्या नुकत्याच रीलिज झालेल्या ट्रेलरचेही मनापासून कौतुक केले.