रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:37 IST2025-04-14T09:35:42+5:302025-04-14T09:37:07+5:30
'हायवे' सिनेमाचा रणबीर कपूरशी संबंध तरी काय?

रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
२०१४ साली आलेला इम्तियाज अलीचा (Imtiaz Ali) 'हायवे' (Highway) चांगलाच गाजला. सिनेमातील आलिया भटच्या (Alia Bhatt) अभिनयाचं आजही कौतुक होतं. तसंच यामध्ये रणदीप हुडाचीही (Randeep Hooda) मुख्य भूमिका होती. सिनेमात त्याची महाबीर भाटी ही भूमिका आहे जो आलियाचं अपहरण करतो असं दाखवण्यात आलं आहे. हायवे म्हटलं की नेहमीच आलियाबद्दलच बोललं जातं. रणदीप हुडाचं नाव खूप कमी वेळा येतं. सिनेमाच्या प्रमोशनवेळीही रणदीपला मुद्दामून दूर ठेवण्यात आलं होतं. याचं कारण चक्क रणबीर कपूर होता. नुकतंच रणदीप हुडाने यावर भाष्य केलं आहे.
रणदीप हुडा नुकताच सनी देओलसोबत 'जाट' सिनेमात दिसत आहे. या सिनेमाच्या प्रमोनशवेळी रणदीपने 'हायवे'सिनेमाबद्दलही भाष्य केलं. रणबीर कपूरमुळे त्याला हायवेच्या प्रमोशनपासून दूर ठेवण्यात आलं होतं असं तो म्हणाला. यामागचं कारण आपल्यालाही माहित नसल्याचं सांगितलं. रणदीप हुडा म्हणाला," हायवे च्या प्रमोशनवेळी काय झालं ते मीही पाहिलं. रणबीर कपूरचं या सिनेमाशी काय घेणंदेणं होतं मलाही कळलं नाही."
हा सिनेमा आलियावर होता पण रणदीपशिवाय सिनेमा अपूर्णच आहे. ् त्यानेही सिनेमात अभिनयाची छाप पाडली. तरी सुद्धा त्यावेळी त्याला सिनेमाच्या प्रमोशनपासून दूर ठेवलं गेलं. 'हायवे' सिनेमा समाजावर प्रभाव पाडणारा होता. सर्वांनीच अप्रतिम काम केलं होतं. सिनेमाचा क्रिटिक्स अवॉर्डही मिळाला होता.
'हायवे'ची कहाणी
आलिया भटने सिनेमात वीरा ही भूमिका साकारली. लहानपणीच वीराला एका नातेवाईकाकडूनच लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. ही गोष्ट कायम तिच्या मनात राहते. मोठी झाल्यावरही त्या गोष्टीचा वीराच्या मनावर खोलवर परिणाम झाला असोत. वीराच्या लग्नाच्या काही दिवल आधी महावीर अचानक तिचं अपहरण करतो. तो तिला हिमालयात घेऊन जातो. अपहरण केलं असलं तरी तो तिला हातही लावत नाही. आलिया यावेळी अक्षरश: स्वतंत्र आयुष्य जगते, मजा करते. तिला पिंजऱ्यातून सुटून आपण उडतोय असंच वाटत असतं. या प्रवासात ती महावीरच्या प्रेमातही पडते. त्याच्यासोबत संसार करण्याचे स्वप्न पाहते. मात्र कहाणीचा शेवट वाईट होतो. वीराच्या शोधात आलेले पोलिस महावीरला गोळी मारतात आणि त्याचा मृत्यू होतो. वीरा कोलमडते. घरी आल्यावर ती लहानपणी घडलेली सर्व घटना आईवडिलांना सांगते आणि मन मोकळं करते. ते ऐकून सर्वांना धक्काच बसतो.