आता मी एकटा पडलोय, रणधीर कपूर यांनी सांगितली त्यांच्या मनाची अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 03:12 PM2021-02-13T15:12:16+5:302021-02-13T15:19:17+5:30
राजीव यांचे निधन झाले त्यावेळी रणधीर कपूर त्यांच्यासोबतच होते. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे.
राजीव यांचे निधन झाले त्यावेळी रणधीर कपूर त्यांच्यासोबतच होते. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. राजीव यांची तब्येत अचानकपणे कशी खराब झाली याविषयी रणधीर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. रणधीर यांनी सांगितले की, मला आरोग्यसंबंधीत काही समस्या असल्याने माझ्यासोबत २४ तास एक तरी नर्स असते. माझ्यासोबत असलेली नर्स राजीवला सकाळी ७.३० वाजता उठवायला गेली तर तो काहीच उत्तर देत नव्हता. त्यामुळे नर्सने त्याच्या हृदयाचे ठोके मोजले तर ते खूप कमी होते आणि सतत कमी होत होते. त्यामुळे त्याला आम्ही लगेचच रुग्णालयात दाखल केले. त्याला आम्ही वाचवण्याचे सगळे प्रयत्न केले. पण त्यात आम्ही असमर्थ ठरलो.
ऋषी आणि नितू यांच्या निधनामुळे कपूर कुटुंब दुःखात असतानाच राजीव यांच्या निधनाने कपूर कुटुंब कोलमडून गेले आहे. त्याविषयी रणधीर यांनी सांगितले, गेल्या काही महिन्यात माझ्या घरातील सदस्यांच्या एकामागे एक झालेल्या निधनामुळे मी संपूर्णपणे कोलमडून गेलो आहे राजीवला कधीच कोणत्या प्रकारचा आजार नव्हता. राजीव खूपच खेळकर वृत्तीचा होता. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. आता मी त्या घरात एकटाच शिल्लक राहिलो आहे.
राजीव कपूर यांनी एक जान है हम या चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला होता. राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.