माझ्या करिअरमध्ये ‘रंगा पतंगा’ महत्त्वाचा

By Admin | Published: March 25, 2016 01:23 AM2016-03-25T01:23:18+5:302016-03-25T01:23:18+5:30

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करीत असलेले अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आजवरच्या कारकिर्दीत

'Ranganga manga' is important in my career | माझ्या करिअरमध्ये ‘रंगा पतंगा’ महत्त्वाचा

माझ्या करिअरमध्ये ‘रंगा पतंगा’ महत्त्वाचा

googlenewsNext

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करीत असलेले अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी प्रथमच पूर्ण लांबीची गंभीर भूमिका केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंदशी साधलेला संवाद...

तुमच्या करिअरमध्ये ‘रंगा पतंगा’ वेगळा कसा?
- अनेक कारणांनी वेगळा आहे. या चित्रपटात मी वैदर्भीय बोली बोललो आहे. मुस्लीम शेतकऱ्याची आणि पूर्ण लांबीची गंभीर भूमिका प्रथमच करतो आहे. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला. माझ्या कामाचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं. या सगळ्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी रंगा पतंगा खूप महत्त्वाचा आणि वेगळा चित्रपट आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांचा वेध घेणारे अनेक चित्रपट यापूर्वी झाले. तरीही ‘रंगा पतंगा’चं महत्त्व काय वाटतं?
- एका शेतकऱ्याची बैलजोडी हरवते आणि तो तिचा कसा शोध घेतो, याची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. केवळ एक कथा न सांगता शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित सर्व अंगांना हा चित्रपट स्पर्श करतो. महत्त्वाचं म्हणजे, तो कोणत्याही प्रकारे थेट भाष्य करीत नाही. सद्य:स्थिती मार्मिक पद्धतीनं मांडण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारकडून मिळणारं अनुदान, धार्मिक राजकारण हे सगळे मुद्दे त्यात आहेत. यापूर्वी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा चित्रपट मी केला होता. त्यातही माझी गंभीर भूमिका होती; मात्र वेगळ्या पद्धतीच्या मांडणीमुळे ‘रंगा पतंगा’ महत्त्वाचा आहे.

तुम्ही सध्या ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहात. ‘रंगा पतंगा’ केल्यानंतर तुम्ही हे काम व्यापक पद्धतीनं सुरू केलंत.. या कामाविषयीही सांगा.
- शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मी पूर्वीपासूनच बोलत आलो आहे. त्या समस्यांची जाणीव होती; म्हणूनच ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा चित्रपट केला होता. गेल्या काही काळात ही जाणीव अधिक तीव्र झाली. हा प्रश्न सातत्यानं चर्चिला जाणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मी बीडचा असल्यानं लहानपणापासून शेतकऱ्यांचं जगणं बघितलं आहे. सध्या फाउंडेशनच्या माध्यमातून विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सबलीकरणाचे प्रयत्न करीत आहोत. जलसंधारण, शेतीविषयक मार्गदर्शन केलं जात आहे.

‘रंगा पतंगा’तील जुम्मन ही गंभीर भूमिका तुम्ही साकारली आहे. तुमची विनोदी अभिनेता ही ओळख यानिमित्तानं पुसली जाईल, असं वाटतं का?
- तसं नक्कीच व्हायला हवं. मी सातत्यानं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करीत आलोय. ‘सुंबरान’, ‘अनवट’, ‘भारतीय’ अशा अनेक चित्रपटांतून वेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. मात्र, पूर्ण लांबीची गंभीर भूमिका करण्याची संधी ‘रंगा पतंगा’तील जुम्मन या व्यक्तिरेखेमुळे मिळाली. वेगळ्या धाटणीच्या भूमिका मिळत राहायला हव्यात. वेगळ्या भूमिकांसाठी मी कायमच तयार आहे. चांगल्या भूमिका असतील, तर मी त्या नक्कीच स्वीकारीन. स्टार असण्यापेक्षा अभिनेता असणं जास्त महत्त्वाचं आहे.

प्रसाद नामजोशी यांच्यासारख्या पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकासह काम करण्याची रिस्क का घ्यावीशी वाटली?
- प्रसाद नामजोशी हा हुशार दिग्दर्शक आहे. त्याला चित्रपट माध्यमाची जाण आहे. प्रसादनं लिहिलेल्या ‘कापूसकोंड्यांची गोष्ट’ आणि ‘हायवेटच गुंठामंत्री’ या चित्रपटांत मी काम केलं होतं; त्यामुळे त्याचा परिचय होता. अमोल गोळे सिनेमॅटोग्राफर म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. त्याच्या कामाची माहिती आहे. मराठीतल्या उत्तम सिनेमॅटोग्राफरपैकी तो एक आहे. अत्यंत उत्साही असं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. त्याशिवाय साउंड डिझाईनसाठी अनमोल भावे, एडिटिंगसाठी सागर वंजारी, संगीत दिग्दर्शनासाठी कौशल इनामदार, गीतलेखनासाठी ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार अशी उत्तम टीम या चित्रपटानिमित्त एकत्र आली होती. चित्रपट ही सांघिक कामगिरी आहे आणि प्रत्येकानंच उत्तम काम केलं आहे.

Web Title: 'Ranganga manga' is important in my career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.