राणी मुखर्जी या क्षेत्रात आजमावणार तिचे नशीब?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:47 PM2019-04-15T17:47:41+5:302019-04-15T17:56:20+5:30
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीच्या हिचकी या चित्रपटाचे आणि या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
अभिनयक्षेत्रात मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शनाकडे वळणे यात काही नवीन नाही. आजवर अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांनी दिग्दर्शन क्षेत्रात आपले भाग्य आजमावले आहे. आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शन क्षेत्रातील आपली इनिंग लवकरच सुरू करणार असल्याची चर्चा आहे.
मर्दानी या चित्रपटाच्या यशानंतर आता मर्दानी २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून राणी मुखर्जी सध्या तिच्या मर्दानी २ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. राणी मुखर्जीने मर्दानी2 चे शूटिंग मार्च महिन्यात सुरू केले आहे. या सिनेमातील चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात राणी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात २१ वर्षीय खलनायकाशी राणीचा सामना होताना दिसणार आहे. दिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार असून गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलची निर्मिती असणार आहे. २०१९ च्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीच्या हिचकी या चित्रपटाचे आणि या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. अभिनयात यश मिळाल्यानंतर आता राणी दिग्दर्शनाकडे वळणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार राणी एक दिग्दर्शिका म्हणून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने दिग्दर्शित केलेला चित्रपट २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे.
राणीने राजा की आयेगी बारात या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी गुलाम, कुछ कुछ होता है असे एका मागोमाग एक तिने हिट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज राणीची गणना होते.
राणी मुखर्जीने प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले असून त्यांना आदिरा ही मुलगी आहे.