अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:21 AM2024-10-10T11:21:09+5:302024-10-10T11:22:01+5:30

बॉलिवूडमध्येही झाली होती रतन टाटांची एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन् झालं होतं मोठं नुकसान

ratan tata once produced amitabh bachchan movie Aetbaar but cinema gets flopped | अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

Ratan Tata Demise: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

रतन टाटांचं भारतीय उद्योगविश्वातील योगदान फार मोठं आहे. टाटा समूहाची जगभरात ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. उद्योगविश्वाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या टाटांनी बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमासाठी टाटा निर्माते झाले होते. २००४ साली अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू मुख्य भूमिकेत असलेला ऐतबार हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. 

ऐतबार हा सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर होता. विक्रम भट यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. फियर या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक होता. या सिनेमाचे रतन टाटा सहनिर्माते होते. पण, बॉक्स ऑफिसवर अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा फार चांगली कामगिरी करू शकला नाही. ९.५० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने केवळ ७.९६ कोटी कमावले. या सिनेमामुळे रतन टाटा यांचं फार मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. यानंतर रतन टाटांनी कुठल्याही सिनेमाची निर्मिती केली नाही. 

दरम्यान, टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 

Web Title: ratan tata once produced amitabh bachchan movie Aetbaar but cinema gets flopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.