Rati Agnihotri Birthday Special : रती अग्निहोत्री यांचा पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरहिट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:00 AM2018-12-10T06:00:00+5:302018-12-10T10:18:49+5:30
रती अग्निहोत्री यांचा आज म्हणजेच 10 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये झाला. अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे तिने अगदी लहानपणीच ठरवले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच मॉडलिंग करायला सुरुवात केली.
रती अग्निहोत्री यांनी शौकिन, स्वामी दादा, फर्ज और कानून यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही प्रेक्षकांना त्यांचा एक दुजे के लिये हाच चित्रपट सगळ्यात जास्त लक्षात आहे. हा रती यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वय केवळ 16 वर्षं होते. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती.
रती अग्निहोत्री यांचा आज म्हणजेच 10 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये झाला. अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे तिने अगदी लहानपणीच ठरवले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच मॉडलिंग करायला सुरुवात केली. त्या लहान असताना वडिलांच्या कामाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब मद्रासला राहायला गेले. त्या शालेय जीवनात असताना शाळेतील अनेक नाटकात काम करत असत. त्याचवेळी एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने त्यांचा अभिनय पाहिला आणि त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. चित्रपटाचे चित्रीकरण केवळ एक महिना सुरू राहाणार असल्याने त्यांच्या वडिलांनी चित्रपटात काम करण्यास त्यांना परवानगी दिली. पण या चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या. त्यांनी केवळ तीन वर्षांत 32 दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी कमल हासनसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते आणि त्यामुळेच एक दुजे के लिये या चित्रपटासाठी त्यांची निवड करण्यात आली.
एक दुजे के लिये हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. य चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. हा चित्रपट केवळ 10 लाखात बनवण्यात आला होता. पण या चित्रपटाने त्या काळात दहा कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. हा चित्रपट मारो चरित्र या तेलगु चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री सरिता नायिका आणि कमल हासन नायक होते. हिंदी रिमेकमध्ये सरिता ऐवजी रती यांना संधी देण्यात आली आणि त्यांनी या संधीचे सोने केले.