'मराठी कलाकार मोठ्या ठिकाणी गेल्यावर बुजून जातात पण..'; रवी जाधवचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:41 PM2023-09-06T14:41:33+5:302023-09-06T14:42:35+5:30
Ravi jadhav: रवी जाधव यांच्या ताली या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेनसोबत अनेक मराठी कलाकार झळकले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव (ravi jadhav) कायमच त्याच्या हटके सिनेमांमुळे चर्चेत येत असतो. मराठीत दर्जेदार सिनेमांची निर्मिती केल्यानंतर रवी जाधवने त्याचा मोर्चा हिंदी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. नुकतीच त्याने दिग्दर्शित केलेली ताली ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. सुश्मिता सेन हिची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये अनेक मराठी कलाकार आहेत. त्यामुळे हिंदी सीरिज असून त्यात मराठी कलाकार जास्त का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे.
तृतीयपंथीय समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर बेतलेली 'ताली' ही सीरिज देशासह विदेशातही लोकप्रिय होत आहे. या सीरिजमध्ये सुश्मिता सेन हिच्यासोबत ऐश्वर्या नारकर, नंदू माधव, हेमांगी कवी, सुव्रत जोशी, कृतिका देव यांसारखे मराठी कलाकार झळकले आहेत. त्यामुळे या सीरिजमध्ये त्यांची निवड का केली तसंच मराठी कलाकारांचं सेटवरचं वागणं कसं असतं हे रवी जाधव यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.
"मराठी कलाकारांचं कसं असतं ते एखाद्या मोठ्या ठिकाणी किंवा वेगळ्या वातावरणात गेले की थोडेसे बुजून जातात. पण, जेव्हा कॅमेरा सुरु होतो तेव्हा त्यांच्यासारखं कुणीच नाही. सगळ्यांना मागे टाकतात ते अभिनयामध्ये. त्यामुळे हे दिग्गज कलाकार घेतल्यामुळे मला त्याचा फायदा झाला. प्रत्येक सीन झाल्यानंतर सुश्मिता येऊन मला सांगायची सर काय कास्टिंग केलीये तुम्ही. जबरदस्त", असं रवी जाधव म्हणाले.
पुढे ते म्हणतात, " त्या कलाकारांनाही जाऊन सांगायची. त्यांचं कौतुक करायची. त्यामुळेच या कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे तालीमध्ये मराठी कलाकार जास्त आहेत."