बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:00 AM2019-05-30T06:00:00+5:302019-05-30T06:00:05+5:30
बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही
बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच त्यांच्या मुलाखतीत किंवा कोणत्याही सार्वजनिक समारंभात अस्खलित इंग्रजी बोलताना दिसतात. यावरून हे कलाकार उच्चशिक्षित असावेत असा आपला नेहमीच समज होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही आणि त्यांनीच ही गोष्ट त्यांच्या मुलाखतींमध्ये कबूल केली आहे.
काजोल
बॉलिवूडमध्ये काजोलला कधीच अपयशला सामोरे जावे लागले नाही. तिने नेहमीच हिट चित्रपट दिले. आता तर काजोलचा चित्रपट म्हणजे तो चांगलाच असणार असे समीकरण बनले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, काजोलने वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षण सोडलेले आहे. अभिनेत्री तनुजा यांची मुलगी काजोलला लहानपणापासूनच अभिनयक्षेत्रात करियर करायचे होते आणि त्याचमुळे ती खूपच कमी वयात या क्षेत्रात आली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते शक्य झाले नाही.
आलिया भट
आलियाने स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिने केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली. त्यामुळे ती कधीच कॉलेजला गेली नाही.
करिश्मा कपूर
करिश्मा कपूरने एकेकाळी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिचे शिक्षण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तिने केवळ सहावीपर्यंतचेच शिक्षण घेतले आहे.
सोनम कपूर
सोनम कपूरचे तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी कौतुक केले जाते. तिने अभिनेत्री बनण्यासाठी बारावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकला होता. पण मी माझे शिक्षण पूर्ण करायला पाहिजे होते अशी खंत तिने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.
सलमान खान
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने आज कित्येक कोटी रुपये कमावले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तो बारावीनंतर कॉलेजला गेलाच नाही.
आमिर खान
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला शिक्षणात कधीच रस नव्हता. शालेय जीवनात असताना तो कधीच शिक्षणात हुशार नव्हता. त्याने कसेबसे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी त्याने शिक्षण सोडले.
रणबीर कपर
रणबीरला दहावीत केवळ 50 टक्के मिळाले होते. त्यामुळे त्याने पुढे शिक्षण न घेता फिल्म मेकिंगचे धडे गिरवायचे ठरवले. फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतल्यावर त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.