कोठारे व्हिजन रंगभूमी गाजवण्यास सज्ज
By Admin | Published: August 4, 2016 02:02 AM2016-08-04T02:02:43+5:302016-08-04T02:02:43+5:30
मालिका, चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता कोठारे व्हिजन नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
मालिका, चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता कोठारे व्हिजन नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. प्रेक्षकांसाठी एका वेगळ्या विषयावरील नाटक कोठारे व्हिजन घेऊन येत आहे. याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती देताना अभिनेता आदिनाथ कोठारेने सांगितले, एक चांगली कथा मिळाल्याने नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय कोठारे व्हिजनने घेतला आहे. या नाटकाची कथा नितीन दीक्षितने लिहिली आहे आणि नाटकाचे दिग्दर्शनदेखील नितीनच करणार आहे. सध्या या प्रोजेक्टवर आमचे काम सुरू आहे. आम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असलो तरी हे नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रेक्षकांनी आजपर्यंत आमच्या चित्रपट, मालिकांवर भरभरून प्रेम केले आहे. आमचे नवीन नाटकदेखील दमदार असल्याने ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. महेश कोठारे यांनी अभिनय, दिग्दर्शन केल्यानंतर कोठारे व्हिजनची स्थापना केली. कोठारे व्हिजन या बॅनरअंतर्गत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया या त्यांच्या मालिका सध्या टेलिव्हिजनवर गाजत आहेत. लवकरच कोठारे व्हिजन आवाज या सीरिजमधील अहिल्याबाई होळकर ही मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. आता त्यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना नक्कीच रंगभूमीवर चांगली कलाकृती पाहायला मिळणार हे नक्की.