वास्तव आयुष्याच्या जिद्दीचा ‘संग्राम’..!

By Admin | Published: April 9, 2017 03:15 AM2017-04-09T03:15:49+5:302017-04-09T03:15:49+5:30

नियती कुणाच्या आयुष्यात कधी कोणता खेळ रंगवेल ते सांगता येत नाही. निखिल कारखानीस या उमद्या तरुणाच्या जीवनातही नियतीने तिचे असे काही फासे टाकले, की

The real struggle for real life 'Sangram' ..! | वास्तव आयुष्याच्या जिद्दीचा ‘संग्राम’..!

वास्तव आयुष्याच्या जिद्दीचा ‘संग्राम’..!

googlenewsNext

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट - ‘ब्रेव्हहार्ट’

नियती कुणाच्या आयुष्यात कधी कोणता खेळ रंगवेल ते सांगता येत नाही. निखिल कारखानीस या उमद्या तरुणाच्या जीवनातही नियतीने तिचे असे काही फासे टाकले, की त्या पडछायेने निखिलचे संपूर्ण आयुष्यच झाकोळून गेले. या घटनेने निखिल पार परावलंबी झाला; मात्र त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्याचे वडील सच्चिदानंद कारखानीस यांनी कंबर कसली. ही कहाणी म्हणजे एखाद्या चित्रपटाची काल्पनिक कथा वाटू शकेल; पण ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटात असलेली ही गोष्ट वास्तवातल्या कारखानीस कुटुंबीयांची सत्यकथा आहे. ही सत्यकथा तितक्याच सत्यतेने आणि प्रामाणिकपणे या चित्रपटात मांडली असून, त्यात खऱ्याखुऱ्या आयुष्याच्या जिद्दीचा ‘संग्राम’ पाहायला मिळतो.
गिर्यारोहनाचे वेड असलेल्या आणि त्याचबरोबर खाद्यपदार्थांत अतोनात रुची असलेल्या निखिल या तरुणाला मेंदूचा दुर्मीळ असा आजार ग्रासतो. यामुळे त्याच्या आयुष्याचा पट पार विस्कळीत होतो. पण, हात-पाय साथ देत नसले तरी जात्याच बुद्धिवान असलेल्या निखिलवर, तो नोकरी करत असलेली कंपनी पूर्ण विश्वास दाखवते. तिथे तो त्याच्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवतो आणि त्याचबरोबर त्याचे छंदही जोपासतो. एकीकडे विकलांग होत चाललेल्या शरीराशी जिद्दीने लढा देत तो सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करत राहतो. या लढ्यात त्याला त्याचे वडील, सच्चिदानंद यांची सदैव साथ लाभते. एखाद-दोन नाही; तर तब्बल २० वर्षे निखिलची ही जबाबदारी ते निश्चयपूर्वक पार पाडतात. या दोघांचा आयुष्याशी असलेला हा एक प्रकारचा संग्रामच आहे. साहजिकच, यातून वडील आणि मुलाच्या नात्याचे गडद प्रतिबिंबही ठोसपणे दृगोच्चर होते.
ही गोष्ट मांडताना, या चित्रपटाने हातचे काही राखून ठेवलेले नाही. त्यामुळे ही सत्यकथा अंतरंगात उतरत जाते. पटकथा व संवादलेखक श्रीकांत बोजेवार यांच्या लेखनावर दिग्दर्शक दासबाबू यांनी दमदार काम केले आहे. कुठल्याही व्यक्तिरेखेला मुद्दामहून उंचावण्याचा यात प्रयत्न केला गेला नसल्याने, या कथेतली प्रत्येक व्यक्तिरेखा खरी वाटते आणि ती सर्वसामान्यांच्या जीवनाशी थेट भिडते. कवी सौमित्रच्या धीरगंभीर आवाजातल्या कवितेसह श्रीकांत कांबळे यांची ध्वनी संरचना, विली यांचे छायाचित्रण व पराग सावंत यांचे संकलन जमून आले आहे.
चित्रपटातली निखिलची मध्यवर्ती भूमिका साकारताना संग्राम समेळ याने त्यात भन्नाट रंग भरले आहेत. पूर्वार्धात खेळकर, प्रसन्न अशी व्यक्तिरेखा ठसवण्यापासून, विकलांग झाल्यानंतरचा दीर्घ प्रवास संग्रामने मोठ्या तडफेने सादर केला आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या देहबोलीचा उत्तम वापर त्याने यात केला आहे. यात वडिलांची, म्हणजे सच्चिदानंद यांची भूमिका रंगवणारे अरुण नलावडे म्हणजे, एखाद्या कलावंतासाठीच खास लिहिलेली भूमिका कशी असू शकेल याचे उत्तम उदाहरण आहे. हा चित्रपट जसा संग्रामचा आहे, तसाच तो अरुण नलावडे यांचाही आहे. त्यांनी या भूमिकेत गहिरी आणि संवेदनशील अदाकारी पेश केली आहे. सुलभा देशपांडे (आजी) व धनश्री काडगांवकर (सुलेखा) यांच्यासह छोट्या छोट्या भूमिकांमध्ये विलास
उजवणे, किशोर प्रधान, अतुल परचुरे, इला भाटे आदी कलावंतांनी छाप पाडली
आहे.
विशेष उल्लेख करावा लागेल तो अभय कुलकर्णी याचा; कारण चित्रपटात त्याला एकही संवाद नसूनही त्याने यातली शेखर ही व्यक्तिरेखा मुद्राभिनयातून ताकदीने उभी केली आहे. वास्तव जीवनात हातचा मुलगा गेल्यावर निर्माण झालेल्या पोकळीनंतर, काही कमवायचे नाही आणि काही गमवायचेपण नाही; अशा नि:स्वार्थ उद्देशाने निर्माते सच्चिदानंद कारखानीस यांच्यासह त्यांचे मित्रवर्य संतोष मोकाशी यांनी हा चित्रपट निर्माण केला आहे. ही गोष्ट अनुभवताना डोळ्यांच्या पापण्या हमखास ओलावतात. समोरचे धूसर दिसू लागेपर्यंत गालावरून ओघळणारे अश्रू बरेच काही सांगून गेलेले असतात आणि मग वास्तवातल्या कारखानीस पितापुत्रांना सलाम करण्यावाचून काही पर्यायच उरत नाही.

Web Title: The real struggle for real life 'Sangram' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.