रूक्ष जगण्यावरचा वास्तव कटाक्ष!

By Admin | Published: April 17, 2015 10:52 PM2015-04-17T22:52:01+5:302015-04-17T22:52:01+5:30

रूक्ष अशा व्यवस्थेतले आणि जगण्यातले जनसामान्यांचे स्थान काय, यावरही चित्रपट कटाक्ष टाकतो. पण हे सर्व करताना कुठेही नाट्यमयता न आणता टोकदार वास्तवाला हा चित्रपट थेट भिडत जातो.

Realistic living! | रूक्ष जगण्यावरचा वास्तव कटाक्ष!

रूक्ष जगण्यावरचा वास्तव कटाक्ष!

googlenewsNext

व्यवस्थेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्यांना या व्यवस्थेच्या चौकटीबाहेर पडायची इच्छा असते; परंतु ती पूर्णत्वास न येण्यासाठी या व्यवस्थेतूनच करण्यात आलेली व्यवस्था याचा थेट लेखाजोखा ^‘कोर्ट’ हा चित्रपट मांडतो. व्यवस्थेतले हे सत्य जाचक असले, तरीपण ते समाजाच्या अंगवळणी पडलेले जाणवते. त्याचे कारणसुद्धा या व्यवस्थेतच दडलेले आहे, हे थेटपणे कोर्ट ठसवतो. रूक्ष अशा व्यवस्थेतले आणि जगण्यातले जनसामान्यांचे स्थान काय, यावरही चित्रपट कटाक्ष टाकतो. पण हे सर्व करताना कुठेही नाट्यमयता न आणता टोकदार वास्तवाला हा चित्रपट थेट भिडत जातो.
चित्रपट हे करमणुकीचे साधन आहेच; पण त्याचबरोबर ते प्रबोधनाचेही एक माध्यम आहे. या गोष्टी जरी असल्या, तरी त्याहीपेक्षा काहीतरी वेगळे दाखवण्याचा अट्टाहास असेल, तर त्यासाठी खास दृष्टी हवी. ही दृष्टी या चित्रपटाचा लेखक व दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्याकडे आहे. ती तो इतरांनाही देऊ पाहतो. कोर्ट म्हटले की सर्वसामान्यांच्या तोंडी तारीख पे तारीख असे परिचित शब्द उमटतात आणि नको ती कोर्टाची पायरी यावरही ठाम मत होते. हे सगळे या चित्रपटातही आहे, पण कोर्टरूमसुद्धा हवीहवीशी वाटायला लावण्याजोगे सामर्थ्यही यात आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटाचे सादरीकरण करताना त्याला दिलेली आगळी ट्रीटमेंट! कोर्टरूम ड्रामा हा या चित्रपटाचा पाया आहे. वास्तविक, कोर्टाचे काम म्हणजे रूक्षपणा या मानसिकतेला हा चित्रपट फाटा देतो. केवळ कोर्टरूमच नव्हे; तर कोर्टात काम करणाऱ्यांचे बाहेरचे जगही हा चित्रपट दाखवतो. ते दाखवताना उगाचच कुठे अवडंबर न माजवता सर्वसामान्यांची भाषा हा चित्रपट बोलतो.
सफाई कामगार असलेल्या वासुदेवचा गटारात गुदमरून मृत्यू होतो. त्याचा ठपका नारायण कांबळे या विद्रोही चळवळीतल्या लोकशाहिरावर ठेवला जातो. आपल्या हक्कांसाठी लढण्याची जाणीव निर्माण करण्याचे काम नारायण कांबळे पोवाड्यांच्या माध्यमातून वस्तीवस्तीत जाऊन करीत असतात. त्यांच्या एका गाण्याच्या संदर्भाने वासुदेव आत्महत्येला प्रवृत्त झाला, असा आरोप नारायण कांबळे यांच्यावर लावला जातो. कोर्टात त्यांच्यावर खटला सुरू होतो. या खटल्याच्या अनुषंगाने कोर्टरूम आणि कोर्टाचे एकूणच कामकाज यावर चित्रपट प्रकाश टाकतो. कोर्टरूममधल्या कंटाळवाण्या कामकाजाचीही गोडी लागावी, असे काम लेखक व दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याने चित्रपटात केले आहे. कोर्टातले प्रसंग चक्क उत्सुकता वाढवत जातात. अतिशय बारीकसारीक गोष्टींकडे त्याने लक्ष पुरवले आहे. केवळ कोर्टरूमपुरतेच हे मर्यादित नाही; तर कोर्टाबाहेरच्या प्रसंगांतही वेगळीच खुमारी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या सर्वसाधारण घटना त्याने सूक्ष्मतेचा चष्मा लावून चितारल्या आहेत; आणि या साध्या घटनाही मनाचा ठाव घेतात. कोर्टरूमच्या व्यतिरिक्त आपलेच रोजचे रहाटगाडगे आपण पडद्यावर पाहतोय, असे वाटायला लावणारी दिग्दर्शकाची दृष्टी बरेच काही सांगून जाते. त्याचे हे म्हणणे पोहोचवण्यासाठी कलावंतांनी घेतलेल्या जबाबदारीतही वेगळेपण आहे. चित्रपटातली कुठलीही व्यक्तिरेखा अजिबात खोटी वाटत नाही. त्यांच्या अभिनयातली वास्तवता पडद्यावरचा खोटेपणाचा मुखवटा बाजूला ठेवून खऱ्याखुऱ्या चेहऱ्याने समोर येते. जनसामान्यांना सहज आपल्याशा वाटतील अशा व्यक्तिरेखा चित्रपटात उभ्या केल्याने त्यांच्याशी थेट संवाद साधला जातो.
नारायण कांबळे हा चळवळीतला कार्यकर्ता चित्रपटातही हाडाचा कार्यकर्ताच दिसतो. रापलेला चेहरा, भेदक नजर, अनुभवांतून येत गेलेली दृष्टी अशा खुणा त्यांच्यातल्या कार्यकर्तेपणाला उठाव देतात. वीरा साथीदार या मुळात अभिनेता नसलेल्या व्यक्तीने ही भूमिका रंगवली आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. गीतांजली कुलकर्णी यांनी साकारलेली सरकारी वकिलाची भूमिकाही तेवढीच सच्ची वाटते. तिची आवाजाची पट्टी, कोर्टरूममध्ये आवश्यक असलेला चेहऱ्यावरचा कोरा भाव हा आतून उतरल्यासारखा वाटतो. त्याचबरोबर कोर्टाबाहेरचे त्यांचे जगणेही त्यांनी अनुभवाच्या बळावर दमदार चितारले आहे. नारायण कांबळे यांचा वकील, विनय वोरा हीसुद्धा चित्रपटातली महत्त्वाची व्यक्तिरेखा! त्यांचे अस्तित्व संपूर्ण चित्रपटभर आहे. विवेक गोम्बर यांनी या पात्राला दिलेली डूब ही अनुभवण्याची बाब आहे. न्या. सदावर्ते हेसुद्धा या कथेचे अंग असून, यात कमाल दाखवताना प्रदीप जोशी यांनी पॉजमधूनही बरेचकाही सांगितले आहे. वासुदेवच्या बायकोची भूमिका छोटी असली, तरी उषा बने यांनी तटस्थतेचा बाज पकडत तिच्यात छान रंग भरले आहेत.

एकीकडे चित्रपटांत चंगळवाद पसरलेला असताना, सर्वसामन्यांचे जगणे पडद्यावर तेवढ्याच पोटतिडकीने मांडणारा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला नसता तर ते नवल ठरले असते. जनमानसाला थेटपणे भिडणाऱ्या या कोर्टात डोकावून पाहिल्यास पदोपदी वास्तवतेचा अनुभव येत जातो. चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी या कोर्टातून मिळत जाते आणि त्यामुळे प्रगल्भतेची एक पायरी चढल्याची जाणीवही हे कोर्ट करून देते. चित्रपट हे करमणुकीचे साधन आहेच; पण त्याचबरोबर ते प्रबोधनाचेही एक माध्यम आहे. या गोष्टी जरी असल्या, तरी त्याहीपेक्षा काहीतरी वेगळे दाखवण्याचा अट्टाहास असेल, तर त्यासाठी खास दृष्टी हवी. कोर्ट म्हटले की सर्वसामान्यांच्या तोंडी तारीख पे तारीख असे शब्द उमटतात. हे सगळे या चित्रपटातही आहे...

Web Title: Realistic living!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.