सामाजिक प्रश्नाचे दाहक वास्तव...!

By Admin | Published: June 11, 2017 02:57 AM2017-06-11T02:57:11+5:302017-06-11T02:57:11+5:30

आधुनिकीकरणाच्या रेट्यात कितीही पुढारलेपण आले; तरी खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागांत मात्र त्याची चाहूलही लागलेली नाही. अशा प्रदेशांत गेल्या शतकाचेच प्रश्न

The reality of the social question ...! | सामाजिक प्रश्नाचे दाहक वास्तव...!

सामाजिक प्रश्नाचे दाहक वास्तव...!

googlenewsNext

- राज चिंचणकर

मराठी चित्रपट - झरी

आधुनिकीकरणाच्या रेट्यात कितीही पुढारलेपण आले; तरी खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागांत मात्र त्याची चाहूलही लागलेली नाही. अशा प्रदेशांत गेल्या शतकाचेच प्रश्न अजून ठाण मांडून बसले आहेत, याची दखल घेत तिथल्या सामाजिक प्रश्नांचे दाहक वास्तव ‘झरी’ हा चित्रपट चितारतो. दुर्लक्षित अशा सामाजिक समस्यांना वाचा फोडत महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटाने हाताळला आहे.
जंगलातली तेंदूपत्ती खुडून पोटाची खळगी भरणाऱ्या पाड्यावरच्या समाजजीवनावर ही कथा प्रकाश टाकते. परप्रांतीय ठेकेदार, त्यांच्याकडून होणारे शोषण, पिळवणूक आणि यासोबतच कुमारी मातांचा प्रश्न धसास लावत ही कथा चाकोरीबाहेरचे जग उलगडून दाखवते. जंगलातल्या या पाड्यावरच्या कथेत ‘झरी’ ही युवती केंद्रस्थानी आहे. श्यामण्णा हा तिथला ठेकेदार आहे आणि पाड्यावरच्या अनेक जणी त्याच्या वासनेच्या शिकार झाल्या आहेत. अर्थात, झरीवरही त्याचा डोळा आहे. मात्र श्यामण्णाच्या कचाट्यात सापडून झरीच्या आईने आत्महत्या केल्याने, झरीचे वडील देवा यांनी तिला लहानपणापासूनच श्यामण्णाची खरी ओळख पटवून दिली आहे. पाड्यावरच्या कष्टकरी युवतींचे शोषण करणे ही श्यामण्णाची सवय आहे; परंतु झरी काही त्याला बळी पडत नाही. अशातच या भागातल्या रस्त्याचे कंत्राट घेऊन महेश हा ठेकेदार शहरातून या पाड्यावर येतो. इथून झरीच्या जीवनात नवा अध्याय सुरू होतो. मात्र तिच्या नशिबात पुढे वेगळेच काही वाढून ठेवलेले असते.
कुमारी मातांचा प्रश्न, परप्रांतीय ठेकेदारांची अरेरावी व त्यांच्याकडून होणारे शोषण असे वास्तव मांडत; दुर्लक्षित समाजाचा जीवनप्रवाह मांडण्याचा प्रयत्न कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी जबाबदारी पेलणाऱ्या राजू मेश्राम यांनी या चित्रपटात केला आहे. हे वास्तव त्यांनी जोरकसपणे उभे केले आहे; परंतु पूर्वार्धात चितारलेल्या शोषणाचा भाग लांबला आहे, त्यामुळे कथेच्या गांभीर्याला धक्का पोहोचतो. अनेकदा कथा रेंगाळल्यासारखी वाटते आणि काही प्रसंगांची पुनरावृत्ती झाल्याचेही जाणवते. मनोरंजन हा या चित्रपटाचा हेतू नाही; तर दुर्गम प्रदेशांत आजही होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा त्यांचा उद्देश आहे. श्यामल चक्रवर्ती यांचे छायाचित्रण जमून आले आहे आणि लोकेशन्सही चांगली निवडली आहेत.
नम्रता गायकवाड हिने यातली ‘झरी’ची मध्यवर्ती व्यक्तिरेखा ठाशीवपणे रंगवली आहे. तिच्या जीवनात येणारी विविध स्थित्यंतरे दाखवताना तिने उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला आहे. पाड्यावरची युवती म्हणून ती शोभली आहे आणि चित्रपटाचा फोकस तिच्यावरच असल्याचे व्यवधान बाळगत तिने रंगवलेली ही भूमिका लक्षवेधी झाली आहे. यात श्यामण्णा रंगवताना मिलिंद शिंदे यांनी ही त्यांची हातखंडा भूमिका असल्याचे स्पष्ट करत, खलनायकही भाव खाऊ शकतो हे सिद्ध केले आहे. तुकाराम बिडकर यांचा देवा आणि कमलेश सावंत यांचा वितू जिवत्यासुद्धा लक्षात राहतो. निशा परुळेकर, अनिकेत केळकर, नागेश भोसले, अनंत जोग यांची साथ ठीक आहे. एकूणच, निव्वळ करमणुकीच्या दृष्टीकोनातून न पाहता एक वेगळा विषय; किंबहुना दुर्लक्षित अशा प्रश्नांचे वास्तव मांडण्याचा या चित्रपटात केलेला प्रयत्न महत्त्वाचा आहे.

Web Title: The reality of the social question ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.