याच कारणामुळे संजय मोने यांचे नाव ठेवण्यात आले संजय... वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:23 PM2018-07-20T18:23:04+5:302018-07-20T18:23:51+5:30
संजय मोने हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच केले जाते. त्यांचे नाव संजय ठेवण्यामागे एक खास कारण आहे. त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव संजय का ठेवले हे त्यांनी नुकतेच नमुने या मालिकेच्या प्रमोशनच्यावेळी सांगितले.
नमुने या कार्यक्रमात संजय मोने पु.ल देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजय मोने ही भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याविषयी ते सांगतात, मी पुलंना फार चांगलं ओळखतो. मी त्यांचा स्नेही होतो. ते खूपच सक्रिय असायचे, त्यांचं आयुष्य सळसळतं आणि ऊर्जेने भारलेलं होतं, त्यांची विनोदबुद्धी तर कमाल होती. त्यांच्यासारखी व्यक्ती मी अजून तरी पाहिलेली नाही. पुलं शिक्षणतज्ज्ञ होते, अभिनेते होते, दिग्दर्शक, कथालेखक, कवी, संगीत दिग्दर्शक आणि उत्तम पेटी वाजवणारेही होते. ते जेव्हा बोलायचे तेव्हा स्पष्टपणे आपलं मत नोंदवायचे. तसंच भारतीय टीव्हीवरचे पहिले महासंचालक होते. त्यांची मी भूमिका साकारत असल्याने मला थोडेसे टेन्शन आले आहे. मला या भूमिकेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळालेला नाही, पण मी त्यांचं सगळं साहित्य वाचलंय. मी त्यांच्या घरीही वारंवार जायचो. मी त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण त्यांचं व्यक्तिमत्त्व मात्र नक्कीच उभं करेन. मी अनेक वर्षं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. मला अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे हिंदी टीव्हीत काम करताना मला काहीही फरक जाणवला नाहीये. भाषा एवढाच एक फरक दोन्ही माध्यमांमध्ये आहे असे मला वाटते.. पुलं हे एक जबरदस्त सर्जनशील माणूस म्हणून मला फार आवडतात. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केलं, सगळ्यांना ते शक्य नसतं. खूप कमी लोकांना ते जमतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं, याचं चित्रण मी उभं करणार आहे, ते अप्रत्यक्षरीत्या मला समाधान देणारंच असेल. आणखी एक किस्सा आहे. माझ्या वडिलांनीही काही वर्षं अभिनय केला आणि मग त्यांनी टेक्सटाईलमध्ये करिअर केलं, पुन्हा त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पुलंच्या नागपूर येथे झालेल्या 'सुंदर मी होणार' या नाटकात संजय नावाचं पात्र रंगवलं होतं. ते त्यांच्या या नाटक प्रवासात होते, तेव्हा माझा जन्म झाला, म्हणून त्यांनी माझं नाव संजय ठेवलं.