नातेसंबंध व तंत्रज्ञानाची घट्ट सांगड
By Admin | Published: January 30, 2016 02:54 AM2016-01-30T02:54:39+5:302016-01-30T02:54:39+5:30
काही वर्षांपूर्वी अंबर हडप व गणेश पंडित या जोडगोळीच्या ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेने विविध स्पर्धांतून धूम उडवली होती. याच एकांकिकेवर आधारित त्याच नावाने निर्माण केलेला हा चित्रपट आहे.
- मराठी चित्रपट
राज चिंचणकर
बंध नायलॉनचे
काही वर्षांपूर्वी अंबर हडप व गणेश पंडित या जोडगोळीच्या ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेने विविध स्पर्धांतून धूम उडवली होती. याच एकांकिकेवर आधारित त्याच नावाने निर्माण केलेला हा चित्रपट आहे. अर्थात एकांकिका आणि चित्रपट यातला मोठा फरक लक्षात घेता आणि असे माध्यमांतर करताना त्यात बरेच पाणी घालण्याची वेळ येऊ शकते. परिणामी त्यातून निर्माण होणारी कलाकृती सकस होईलच याची प्रत्येकवेळी खात्री असतेच असे नाही. पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे काही झालेले नाही आणि ही त्याची जमेची बाजू म्हणावी लागेल.
हा चित्रपट पूर्णत : एका संकल्पनेवर आधारलेला आहे. ही संकल्पना मान्य करूनच हा चित्रपट पाहावा लागतो अन्यथा नमनालाच गडबड होऊ शकते. ही संकल्पना कोणती हे स्पष्ट केले तर या गोष्टीतली मजाच निघून जाईल. त्यामुळे ती जशीच्या तशी गृहीत धरूनच पुढे जावे लागेल.
देवदत्त म्हणजेच देव, हा त्याची बायको अनिता व मुलगी सारा यांच्यासह एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेतून मुंबईत येतो. छोट्या साराच्या मनात आजी-आजोबांविषयी काही कल्पना आहेत आणि आजी-आजोबा घरात हवेतच, असा हट्ट तिने देवकडे चालवलेला असतो. त्यामुळे देव त्याच्या गावाला असलेल्या आईवडिलांपुढे साराची ही मागणी ठेवतो. पण देव आणि त्याच्या आईवडिलांमध्ये भूतकाळात घडून गेलेल्या काही घटनांमुळे ते दोघे देवकडे येण्यास राजी होत नाहीत. मग या तिढ्यातून देवचा शास्त्रज्ञ मित्र रवी एक भन्नाट शक्कल लढवतो आणि साराला आजी-आजोबा मिळतात. अहं, इथे चित्रपट संपत नाही; तर या आजीआजोबांमुळेच चित्रपट खऱ्या अर्थाने सुरू होतो. हा काय प्रकार आहे, याची उत्सुकता वाटणे साहजिकच आहे. पण ते थेट पडद्यावर पाहणेच इष्ट ठरेल. कारण त्यातच खरी गंमत आहे. आधुनिकतेचा वसा घेतलेल्या सध्याच्या जगरहाटीत मानवी भावना, नाती, संवेदना यांवर तंत्रज्ञानाची मजबूत पकड बसत आहे का, अशी शंका घेण्यास मोठा वाव आहे. किंबहुना आजची पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी गेली आहे, असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. या प्रवाहाचा दाखला देणारा चित्रपट म्हणून ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटाकडे पाहावे लागेल. त्यानुसार नातेसंबंध आणि तंत्रज्ञानाची
घट्ट सांगड या गोष्टीत घातली गेली आहे. कथा, पटकथा व संवादलेखन करणारे अंबर हडप, गणेश पंडित व जतीन वागळे या त्रयीने ही जबाबदारी सक्षमतेने पार पडली आहे. एक हटके बाज देत अनोखी संकल्पना त्यांनी यात रुजवली आहे आणि त्याबरहुकूम या चित्रपटाचे जतीन वागळे यांनी केलेले दिग्दर्शन योग्य मेळ घालणारे आहे. गोष्ट फुलवत नेण्याची हातोटी या टीमकडे आहे. साहजिकच उत्कंठा वाढवण्याचे काम यातले प्रसंग करीत जातात. टाळ्या घेणारी वाक्ये तर यात आहेतच; परंतु त्याचबरोबर मानवी स्वभावाचे अंतरंग उलगडून दाखवण्याची ताकदही यात प्रकर्षाने दिसून येते. मात्र काही प्रसंगांत मानवी संवेदना आणि तंत्रज्ञान यातला फरक स्पष्ट करताना अनेकदा तो मुख्य धारेपासून वेगळा झालेला
जाणवतो. शिरीष देसाई यांचे कॅमेरावर्क आणि अमितराज यांचे संगीत चित्रपटाच्या जातकुळीला साजेसे झाले आहे.
सुबोध भावे रूढार्थाने या चित्रपटाचा नायक असला तरी यात भाव खाऊन जातात ते डबल रोल साकारणारे महेश मांजरेकर व मेधा मांजरेकर! या डबल रोलमधून परस्परविरोधी भूमिका या दोघांच्या वाट्याला आल्या आहेत आणि दोघांनीही त्या समरसून साकार केल्या आहेत.
महेश मांजरेकर यांनी रंगवलेले रघुनाथ जोगळेकर लक्षात राहण्याजोगे आहेत. सुबोध भावे (देव) व श्रुती मराठे (अनिता) यांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे. सारा रंगवणारी प्रांजल परब गोड आहे. संदेश उपश्याम, संजय नार्वेकर, सुनील बर्वे यांनी छोट्या भूमिकांमध्ये यथायोग्य रंग भरले आहेत.
मानवी नात्यांची वीण आणि तंत्रज्ञानाची अनोखी ओळख ठसवू पाहणारी ही गोष्ट त्यातल्या हटके संकल्पनेमुळे वेगळी ठरली आहे.