रेमो डिसुझा सांगतोय मला मिळालेल्या यशामागे या व्यक्तीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 03:57 PM2018-09-19T15:57:32+5:302018-09-19T17:34:02+5:30
‘डान्स+4’ या नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाच्या या चौथ्या आवृत्तीत “सपने सिर्फ अपने नहीं होते” हा सूचक संदेश दिला जाणार असून त्याद्वारे आपल्याला हे यश प्राप्त व्हावे, यासाठी अनेक प्रकारे हातभार लावणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर आपली साथ देणाऱ्या साथीदारांचाही सन्मान केला जाणार आहे.
यशाचा प्रवास हा अवघड आणि अडचणींचा असतो; त्यामागे मोठे परिश्रम असतात, निश्चय, धैर्य, वेदना, स्वत:वरील आत्मविश्वासाबद्दल शंका उत्पन्न होणे आणि कधी कधी निराशेने घेरले जाणे, यासारख्या विविध भावभावनांचा मिलाफ त्यात झालेला असतो आणि त्यामुळे यश प्राप्त झाल्यावर एक प्रकारचा थकवाही जाणवतो. मात्र हा प्रवास एकाकी कधीच नसतो. आपल्याला हे यश मिळेल, याचा विश्वास वाटत असलेल्या आपल्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींनीही त्यांच्या वैयक्तिक जीवनात काही तडजोडी केलेल्या असतात आणि त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालेले असते. या निकटच्या व्यक्तींनी आपले स्वप्न हे त्यांचेच स्वप्न म्हणून स्वीकारलेले असते आणि ते आपल्या बऱ्या वाईट कालखंडात आपल्यासोबत राहतात. आपल्याला आधार देणाऱ्या व्यक्तींमध्ये आपले आई-वडील, शिक्षक, मित्र तसेच काही खास व्यक्ती यांचा समावेश असतो.
आता ‘डान्स+4’ या नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाच्या या चौथ्या आवृत्तीत “सपने सिर्फ अपने नहीं होते” हा सूचक संदेश दिला जाणार असून त्याद्वारे आपल्याला हे यश प्राप्त व्हावे, यासाठी अनेक प्रकारे हातभार लावणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर आपली साथ देणाऱ्या साथीदारांचाही सन्मान केला जाणार आहे. या संदेशावर भाष्य करताना कार्यक्रमातील सुपरजज रेमो डिसुझा सांगतो, “एखाद्या स्टार कलाकाराची प्रशंसा करणं ही फारच सोपी गोष्ट आहे. पण त्याला हे यश प्राप्त करण्यासाठी मदत करणाऱ्या आणि सतत आधार देणाऱ्या व्यक्तीला आपण विसरतो. मी आज बॉलिवूडमध्ये एक नामवंत नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळखला जात असलो, तरी माझ्या या ‘प्लस’शिवाय म्हणजेच माझ्या आईच्या मदतीशिवाय मी आज या स्थानावर पोहोचूच शकलो नसतो. माझ्यासारख्याच इतरांकडेही अशा मर्मस्पर्शी आणि रंजक कथा असतील, यात शंका नाही. आता ‘डान्स+4’ या कार्यक्रमात यशस्वी कलाकारांच्या जीवनातील अशा ‘प्लस’चा गौरव करण्यात येईल आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल त्यांना नृत्यांजली अर्पण केली जाईल.”
यंदाच्या आवृत्तीत नृत्याचा दर्जा पूर्वीपेक्षा उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नर्तकांशी स्पर्धकांना स्पर्धा करावी लागेल. याशिवाय या स्पर्धकांना पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये विजयी ठरलेल्या नर्तकांची आव्हाने आणि नृत्याविष्कारही स्वीकारावा लागेल. यंदाच्या कार्यक्रमातील नृत्याचा दर्जा यापूर्वीच्या सर्व आवृत्त्यांपेक्षा अधिक उच्च राखण्याचा प्रयत्न केला जाणार असून शैली आणि तंत्राच्या मदतीने मन थक्क करणारा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या कार्यक्रमाचा सुपरजज रेमो डिसूजा असून शक्ती मोहन, धर्मेश येलांडे आणि पुनित पाठक परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत तर राघव जूयाल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.