REVIEW: कबाली - इमोशनच्या नादात अडकलेला अॅक्शन सिनेमा
By Admin | Published: July 22, 2016 02:36 PM2016-07-22T14:36:55+5:302016-07-22T14:47:59+5:30
तब्बल 160 कोटी खर्च करुन बनवण्यात आलेला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' चित्रपट रिलीज झाला आहे
>शिवराज यादव -
स्टार - 2/5
कास्ट - रजनीकांत, राधिका आपटे, विन्स्टन चाओ, धन्सिका, किशोर, दिनेश रवी
मुंबई, दि. 22 - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट ज्याच्याबद्दल गेले काही दिवस तुफान चर्चा सुरु आहे तो 'कबाली' चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. तब्बल 160 कोटी खर्च करुन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. पहिल्यांदाच सकाळी 5 वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरु करण्यात आले आहेत. चित्रपटाची प्रसिद्धी निर्मात्यांना जितकी करावी लागली नाही, तितकी सोशल मिडियावर या चित्रपटाची प्रसिद्धी झाली आहे. चित्रपटाबद्दल इतकं बोललं जात आहे की, रजनीकांतचे चाहते नसणारे प्रेक्षकदेखील हा चित्रपट नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.
मलेशियामधील भारतीयांच्या हक्कांसाठी लढणा-या डॉनचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सोबतच डॉन म्हणून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चाललेली चढाओढ यामध्ये दाखवण्यात आली आहे. 'कबाली' हा एक तामिळनाडूमधील भारतीय आहे. जो आपलं सर्व सोडून बायकोसोबत मलेशियामध्ये राहायला येतो. भारतीयांना समान हक्क मिळावेत म्हणून तो नेतृत्व करुन लढा देतो. यादरम्यान त्यांच्या नेत्याशी त्याची भेट होते आणि तेथून त्याचा डॉन होण्याचा प्रवास सुरु होतो. डॉन झाल्यावर त्याच्याच गँगमधील त्याच्या विरोधात गेलेले त्याचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि एका हल्ल्यात त्याची पत्नी तो गमावतो आणि 25 वर्षांसाठी कारागृहात जातो. परत बाहेर आल्यावर मग तो पुन्हा आपलं साम्राज्य प्रस्थापित कसा करतो ? गरोदर असताना गोळ्या घालून मारण्यात आलेली पत्नी जिवंत असल्याचं माहिती पडल्यावर तिचा शोध लागतो की नाही ? हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
रजनीकांतने मुख्य 'कबाली'ची भुमिका निभावली आहे. रजनीकांत चित्रपटात असल्याने प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. चित्रपटातील कथानक आणि ट्रेलर पाहता चित्रपटात भरपूर अॅक्शन असेल या अपेक्षेने प्रेक्षक चित्रपटातगृहात जातात. मात्र चित्रपट पाहताना पुर्ण अपेक्षाभंग होतो. चित्रपटात इमोशनचा भडिमार करण्यात आल्याने रजनीकांतची अॅक्शन पाहायला आलेला प्रेक्षक कंटाळतो. मात्र रजनीकांतचा अभिनय उत्तम आहे, हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. बॅकग्राऊंड म्युझिक काही वेळानंतर भडक वाटायला लागतो. रजनीकांतचे आधीचे चित्रपट डोक्यात ठेवून चित्रपटगृहात गेलात तर नक्कीच निराशा होते.
मात्र अॅक्शनची चाहते नसून भावनिक चित्रपट आवडणा-यांना हा चित्रपट आवडू शकतो. रजनीकांत, राधिका आपटे यांनी एकमेकांसोबतचे इमोशनल सीन्स अत्यंत सुंदररित्या केले आहेत. खुप वर्षानंतर जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा दोघांनी केलेला सीन नक्कीच आवडतो. रजनीकांतच्या सुरुवातीच्या सीनला प्रेक्षक टाळ्या वाजवून आपल्या अपेक्षा व्यक्त करतात. मात्र पुढचा सगळा चित्रपट शांत बसतात.
रजनीकांतचा अभिनय पाहायचा असेल तर चित्रपट नक्की पाहा, मात्र हा मसालापट अजिबात नाही आहे. त्यामुळे इतर तामिळ चित्रपटांप्रमाणे अॅक्शन, डान्स यात नाही. अॅक्शन सिक्वेन्स गरजेनुसार थोड्याच प्रमाणात वापरण्यात आले आहेत. राधिका आपटे मध्यांतरानंतर सलग दिसते, तोपर्यंत तुटक तुटक सीन्समध्ये दिसत असते. तिने आपली भुमिका चांगली निभावली आहे.
रजनीकांतने आपल्या वयाला साजेशी भुमिका आल्याने त्याचा वावर सहज वाटतो. त्याची हालचाल, वागणं, बसणं, हसणं एका डॉनला साजेसं असल्याने डॉन म्हणून त्याला स्विकारणं अवघड जात नाही. रजनीकांतचे फॅन असाल आणि रजनीकांतचा अभिनय पाहायचा असेल तर चित्रपट नक्की पाहा. मात्र मनोरंजन, टाईमपास म्हणून जात असाल तर नाही पाहिलात तरी चालेल. थोडक्यात सांगायचं तर इमोशनच्या नादात अडकलेला अॅक्शन सिनेमा 'कबाली'.