12th Fail Movie Review : जिद्द आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा '१२वी फेल'
By संजय घावरे | Published: October 28, 2023 09:52 PM2023-10-28T21:52:45+5:302023-10-28T21:56:38+5:30
12th Fail Movie Review : हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या '१२वी फेल' या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची हि कथा आहे.
>> संजय घावरे
हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या '१२वी फेल' या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची हि कथा आहे. 'शिकारा'नंतर तीन वर्षांनी विधू विनोद चोप्रांनी चित्रपट दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा होत्याच, ज्या प्रबोधनासोबतच मनोरंजन करत '१२वी फेल' पूर्ण करतो.
कथानक : चंबलमधील बिलगावातील मनोजच्या वडीलांना भ्रष्टाचाराला विरोध केल्याने निलंबित केलं जातं आणि चित्रपटाची कथा सुरू होते. काॅपी करायला न मिळाल्याने मनोज बारावीत नापास होतो. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्याचे वडील कोर्टात जातात. मनोज भावाच्या साथीने जुगाड चालवतो, पण आमदार त्याच्या भावाला पोलिस कोठडीत टाकतो. त्यावेळी मनोज प्रामाणिक अधिकारी असलेल्या डीएसपी दुष्यंत सिंहला रात्री झोपेतून उठवून चौकीत आणतो. त्यावेळी मनोजला प्रामाणिकपणाची शक्ती योग्य हाती असेल तर काय होऊ शकतं याची जाणीव होते व तो आयपीएस बनण्याचा निर्णय घेतो.
लेखन-दिग्दर्शन : आयपीएस किंवा आयएएस अधिकारी बनणं, युपीएससीची परीक्षा देणं सोपं नाही. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतोच, पण पेशन्सही ठेवावे लागतात. जिथे हुषार मुलांची डाळ शिजत नाही, तिथे १२ वी नापास तरुण आयपीएस बनून कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल करतो. इतरांसाठी प्रेरणादायी पटकथा आणि त्याला अनुसरून लिहिलेले संवाद मनाला भिडतात. काही ठिकाणी सिनेमा भावूक करतो. आजी-नातवामधील संवाद, मित्रांचे सीन्स, स्वत: फेल होऊनही इतरांना मार्ग दाखवणाऱ्या गौरीचा संघर्ष, प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न आणि प्रेयेसीने समजून घेऊन दाखवलेला विश्वास असे बरेच प्रसंग छान झाले आहेत. बऱ्याच दृश्यांमध्ये रंगभूषेतील फरक जाणवतो. पार्श्वसंगीतासोबत काही सीन्समध्ये शांततेचाही छान वापर केला आहे. अटल बिहारी वाजपेयींची 'हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा...' या कवितेचा सुरेख वापर केला आहे.
अभिनय : एक वेगळाच विक्रांत मेस्सी यात आहे. विक्रांतने घेतलली मेहनत त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव करणारी ठरेल. प्रत्येक सीनमध्ये त्याने जीव ओतला आहे. मेधा शंकरने त्याला सुरेख साथ दिल्याने एक हलकी फुलकी लव्हस्टोरीही पाहायला मिळते. प्रियांशु चॅटर्जीने प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका चोख बजावली आहे. अंशुमन पुष्करने स्वत: परीक्षेत फेल होऊनही इतरांना मदत करणारा गौरीभैया आणि अनंत जोशीने ग्वाल्हेरमध्ये गेल्यापासून शेवटपर्यंत मनोजला मदत करणारा मित्र पांडे छान साकारला आहे. इतरांची कामंही चांगली झाली आहेत.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, वातावरण निर्मिती, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत
नकारात्मक बाजू : रंगभूषा, मसालापटांच्या चाहत्यांना आवडणार नाही
थोडक्यात काय तर देशातील शिक्षण व्यवस्था, लोकांची विचारसरणी आणि व्यवस्थेवरही हा सिनेमा भाष्य करतो. संघर्ष म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर प्रत्येकाने विशेषत: तरुणाईने हा सिनेमा नक्की बघायला हवा.